विदर्भ

दादालोरा खिडकी योजने अंतर्गत प्रा. आ. केंद्र गोठणगाव येथे आरोग्य निदान शिबीर संपन्न

नवेगाव बांध :- रक्तदाब ,मधुमेह संबधाने ब्लड शुगर तसेच सिकंलसेल तपासणी व किशोरवयीन मुली व महिलांना मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेचे महत्व यावर विशेष भर क्रांतिसूर्य, वीर बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त जिल्हा पोलिस दादालोरा खिडकी योजनेच्या (एक हात मदतीचा)अंतर्गत आरोग्य विभाग व पोलिस विभागाच्या एकत्रित सहकार्याने नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथे रविवारी (दि.९) मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 60 नागरिकांची आरोग्य तपासणी, प्रयोगशाळा तपासणी, समुपदेशन व औषधाचे वितरण करण्यात आल्याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगावचे वैद्यकिय अधिकारी डॉ.मोनाली तरेकार यांनी दिली आहे. आरोग्य निदान शिबीरापुर्वी क्रांतिसूर्य, वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
आरोग्य शिबिरातून लोकांची असंसर्गजन्य कार्यक्रम अंतर्गत रक्तदाब व मधुमेह संबधाने ब्लड शुगर तसेच सिकंलसेल तपासणी करण्यात आली.या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगावचे वैद्यकिय अधिकारी डॉ.मोनाली तरेकार यांनी शिबीरासाठी आलेल्या लोकांची आरोग्य तपासणी केली तसेच किशोरवयीन मुली व महिलांना मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेचे महत्व याबाब्त मार्गदर्शन केले तर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रशांत खरात यांनी सिकलसेल तपासणी तर प्रिती म्हसके यांनी सिबीसी, रक्त शर्करा पातळी(ब्लड शुगर) तपासणी केली. आरोग्य सेविका प्रमिला रॉय व आरोग्य सहायिका चंदा डोंगरे व चिरायु वावरे यांनी लोकांची रक्तदाब तपासणी, वजन व उंची केली. फार्मासिस्ट मुकुल बडवाईक यांनी औषध वितरण केले तसेच अरविंद उईके यांनी रुग़्णांची नोंदणी केली तर प्रभाकर उईके यांनी लोकांना केस पेपर देण्यास सहकार्य केले.