रत्नदीप विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांना ‘प्रमानंद रंगारी प्रेरक’ पुरस्कार प्रदान
सडक अर्जुनी :- आरंभ फाउंडेशन इंडियाच्या वतीने मंगळवारी (ता.2) चिखली येथील रत्नदीप विद्यालयातील मार्च 2024 मध्ये इयत्ता दहावीत उत्तीर्ण तीन गुणवंत विद्यार्थ्यांना ‘प्रमानंद रंगारी प्रेरक पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल.एम.पातोडे होते.पुरस्कार वितरक म्हणून आरंभ फाउंडेशनचे संस्थापक प्रमानंद रंगारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून फाउंडेशनच्या आधारस्तंभ शकुंतलाबाई रंगारी, हर्षाताई रंगारी, कुसुमताई कांबळे, आरंभ रंगारी, भोजराज रामटेके, कमलराव रंगारी, प्रकल्प समन्वयक आर. व्ही. मेश्राम, सेवानिवृत्त शिक्षक ए. बी. बोरकर, एच.पी. डोंगरे आदी उपस्थित होते.
प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.आरंभ फाउंडेशनद्वारे 2024 मध्ये झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेत विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या गणेश महेश बोरकर, द्वितीय कु. हिमांशी अरविंद भेंडारकर व तृतीय कु. काजल ज्ञानेश्वर कोरे आदी तीन विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, मेडल, रोख रक्कम, नोटबुक, पेन व पुष्पगुच्छ देऊन प्रमानंद रंगारी व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी सदर कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक ए. बी.बोरकर व एच.पी.डोंगरे यांचा आरंभ फाउंडेशनच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रमानंद रंगारी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, विद्यार्थ्यांनी एकमेकांशी इंग्रजीत बोलावे,जिद्द ठेवावी,मेहनत घ्यावी आणि पुढे जाऊन यश संपादन करावे. उल्लेखनीय म्हणजे, आरंभ फाउंडेशनचे संस्थापक प्रमानंद रंगारी यांनी चिखली येथील रत्नदीप विद्यालयातून इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून ते सध्या अमेरिकेत नोकरीवर आहेत. ते फाउंडेशनच्या वतीने गुणवंत, होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक मदत कार्य म्हणून विविध उपक्रम राबवित आहेत.
प्रकल्प समन्वय आर.व्ही. मेश्राम यांनी आरंभ फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रास्ताविकेतून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एस. बी.मेंढे यांनी केले तर आभार पी. एच.पटले यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक एच. ए. लांडगे, कु.आर. एम.पर्वते, लक्ष्मी कोरे,उज्वला भेंडारकर, वाय. जी. कोरे आदी उपस्थित होते.
सडक अर्जुनी -चिखली येथील रत्नदीप विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांसह उपस्थित अमेरिका येथील आरंभ फौंडेशनचे इंडियाचे प्रमानंद रंगारी व इतर मान्यवर.