विद्यार्थी दशेतच नाव लौकिक करण्याची जिद्द असते : उपायुक्त डॉ सिध्दार्थ गायकवाड यांचे प्रतिपादन
गोदिंया :- आजचा विद्यार्थी हा काही तरी करण्याची धडपड मनात निर्माण करत असतो. आमच्या सानिध्यात राहणारा विद्यार्थी हा नेहमी आपला प्रयत्न करुन जीवन जगत असतो. निवासी शाळेत व वसतिगृहात राहुन अनेक विद्यार्थी आपले भविष्य घडवत असतात. याचे प्रतिबिंब म्हणून हे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा पात्र झालेले विद्यार्थी आहेत. म्हणूनच विद्यार्थी दशेतच नाव लौकिक करण्याची जिद्द असते. असे प्रतिपादन समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ सिद्धार्थ गायकवाड यांनी केले. ते पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मंचावर डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विनोद मोहतूरे, शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर इठूले, प्रभारी गृहपाल प्रदिप ढवळे आदी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी सहाय्यक शिक्षक मुन्नाभाई नंदागवळी यांच्या मार्गदर्शनात लेझीम पथकाने लेझीम सादरीकरण करुन मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शालेय परिसरात डॉ. सिध्दार्थ गायकवाड व विनोद मोहतूरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नंतर प्रवेशोत्सव सेल्फी स्टन्डवर स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रम हा अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपूरा मुर्री येथे दुपारी १२.१५ वाजता आयोजित करण्यात आला होता.
अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपूरा मुर्री शाळेतील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परिक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात या शाळेने बाजी मारली आहे. तब्बल एकुण आठ विद्यार्थी पात्र झाले असून सदर विद्यार्थी यांना शिष्यवृत्ती शासनाकडून मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याकडून अनेकांनी प्रेरणा आणि अनुभव घ्यावे असे ही सिध्दार्थ गायकवाड यांनी सांगितले.
कार्यक्रम संचालन अस्मिता तेलंग यांनी करुन आभार साधना पारधी यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वितेसाठी सहाय्यक शिक्षक नीता भलमे, मुन्नाभाई नंदागवळी, शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेऊन यशस्वी केले.