आयुष्यमान आरोग्य मंदिर बोपाबोडी येथे जेष्ठ लोकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
गोंदिया :- आपल्या भारतातील सामान्य लोकसंख्या ही साधारण 2 टक्क्यांनी वाढते.पण, त्याहीपेक्षा ज्येष्ठ तसेच वृद्ध लोकांची संख्या ही 4 टक्क्यांनी वाढतेय.वृद्धांची संख्या वाढण्यामागे खरंतर अनेक कारणं आहेत यामध्ये विस्तारित आयुर्मान,कौटुंबिक रचना, आरोग्याच्या समस्या इ.यांसारखी अनेक कारणं आहेत. जेव्हा वृद्धांच्या काळजीचा विचार केला जातो तेव्हा काळजी देण्याच्या प्रणालीचे अनेक घटक अज्ञात राहतात.काळजीवाहू व्यक्तीला सर्वांगीण मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध योग्य दृष्टिकोनाचा अभाव असतो.आजच्या काळात 40-60 वयोगटातील काम करणाऱ्या पिढीसाठी कुटुंबातील वृद्ध ज्येष्ठ/पालकांचे आरोग्य सांभाळणे हे खरंतर एक आव्हानच झालं आहे. अशातच आपल्या घरातील वृद्धांची जे खरंतर मानसिक आणि शारिरीक समस्यांनी ग्रस्त आहेत अशा रूग्णांची काळजी कशी घ्यावी हा खरंतर प्रश्नच आहे.
वृद्धांची काळजी घेणाऱ्यांना भेडसावणाऱ्या काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर बोपाबोडी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा किरसान यांच्या कल्पक विचारातुन गावातील वयोवृद्ध व जेष्ठ लोकांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन( दि.6 जुलै) रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर बोपाबोडी येथे संपन्न झाले. बोपाबोडी येथील सरपंच निखिलजी मेश्राम व उपसरपंच गणेशजी कापगते यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ लोकांची तपासणी करण्यात आली.सर्वात प्रथम मान्यवरांच्या हस्ते माता धन्वंतरीचे पुजन करण्यात आले.शिबिरामध्ये वयोवृद्ध लोकांचेआरोग्यतपासणी,रक्ततपासणी,रक्तदाब,मधुमेह,सिकलसेल,हिमोग्लोबीन तपासणी सोबतच आयुष पद्ध्तीबाबत अग्निकर्म व नस्यचिकित्सेतुन तपासणी सोबतच आयुष्यमान भारत कार्ड,ई-केवायसी करण्यात आल्याची माहीती डॉ.प्रतिभा किरसान यांनी याप्रसंगी दिली आहे.
शिबीराप्रसंगी डॉ.प्रतिभा किरसान यांनी वय वर्ष साठी पार केल्या वर एकदा निवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठ लोकांमध्ये मानसिक आणि वर्तणुकीतील वृत्तींमध्ये बदल होतो. ज्येष्ठांना भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही विशिष्ट गरजांची जाणीव नसते.अशा वेळी त्यांचे अनपेक्षित गैरवर्तन ओळखणे आणि टाळणे याबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे असते.असंयम, स्मृतिभ्रंश, हालचाल ही ज्येष्ठांना भेडसावणारी एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे सांगितले.
जेष्ठ लोकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी सरपंच निखिल मेश्राम,उपसरपंच गणेश कापगते,डॉ.प्रतिभा किरसान,डॉ.मानकर,सामुदायिक आरोग्य अधिकारी चारमोडे,आरोग्य सेविका गायत्री परशुरामकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी योगेश सिदराम,आशा सेविका सुप्रिया कापगते व नम्रता वासनिक यांनी आरोग्य सेवा प्रदान केली.
राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक आरोग्य संस्थेतुन जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येत असुन वरिष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.जेष्ठ लोकांनी नियमित व्यायाम करा, नेहमी सतर्क व कार्यक्षम रहा,सामाजिक कार्यात सहभाग घ्या,सृजनशील व मनोरंजक विचार ठेवा,संतुलित व आरोग्यदायी आहार घ्या,शाकाहारास प्राधान्य द्या,चांगली झोप घ्या व स्वच्छतेच्या सवयी अंगीकारा,चालताना आधारासाठी वॉकर्स,वॉकिंग व स्टिक इत्यादीचा साधनांचा वापर करा,शरीरातील अवयवांचे व पायांची निगा राखा,नियमित वैद्यकीय तपासणी करा व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या.तसेच सौम्य वेद,नाकडे कधीही दुर्लक्ष करू नका,स्वतः आपल्या मनाने औषधोपचार घेऊ नका,असंतुलित आहार घेऊ नका,मद्यपान करणे टाळा,तंबाखूचे सेवन व धूम्रपान टाळा,चहा आणि कॉफीचे अतिरिक्त सेवन करू नये, पर्यावरणातील असुरक्षित धोके टाळा.
-डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी