गुरु साक्षात परब्रम्ह: गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी
अर्जुनी/मोर. : स्थानिक सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट व जी.एम.बी. इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे समन्वयक भगीरथ गांधी, व प्राचार्या शैव्या जैन पर्यवेक्षिका वंदना शेंडे उपस्थित होते. प्रथमतः पाहुण्यांच्या हस्ते माता सरस्वती व माऊली संत ज्ञानेश्वर यांच्या छायाचित्रांचे पूजन व दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमीच उच्च स्थान देण्यात आले आहे. लोक गुरूला देवासारखे पूजनीय मानतात. गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. आपले आयुष्य घडवण्यात गुरुंचा सिंहाचा वाटा असतो. गुरु ही केवळ व्यक्ती नाही, तर आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रत्येक क्षण आणि त्यासाठी माध्यम झालेली वस्तू, व्यक्ती किंवा अन्य कोणतीही गोष्ट गुरु असू शकते. म्हणून ग्रंथांना गुरु मानले आहे तसे अनुभवालाही गुरु मानले आहे, वाटसरूला गुरु मानले आहे, तसे मार्गदर्शन करणाऱ्याला गुरु मानले आहे. ते कोणत्याही रूपात येऊन आपला उद्धार करू शकतात. त्यांच्याप्रती ऋण निर्देश करण्यासाठी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते.
छोट्या चिमुकल्यांनी विविध संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या, त्यामधे रियान आडे याने विठ्ठलाची तर माही चांडक हिने रुक्मिणीची वेशभूषा साकारली होती. कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वर्ग 1 ते 4 करिता ओम चे चित्र काढून त्यात रंग भरणे, वर्ग 5 ते 10 करिता भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला विजयी विद्यार्थ्याना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
व्यास पौर्णिमेची अधिक माहिती आशा ढोमणे यांनी विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रध्दा कापगते यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीक्षा शेंडे, रजनी गूळे, दिपाली दहिवले, उषा नेवारे, ज्ञानेश्वर रोकडे किशोर सोनटक्के तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले