शैक्षणिक

जि. प. शाळा खांबी येथे वनसंवर्धन दिन उत्साहात साजरा

अर्जुनी मोर: – वनसंवर्धन दिन झाडे, डोंगर, नद्या, वने, प्राणी, पक्षी अशा निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे संवर्धन व्हावे, समाजात नैसर्गिक साधनसंपत्तीविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून वनसंवर्धन दिन साजरा केला जातो. संतांनी फार वर्षांपूर्वीच ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे सांगितले आहे. आपल्या पूर्वजांनी वड, पिंपळ, तुळस, आंबा, लिंब अशा असंख्य प्रकारच्या झाडांना महत्व दिले. अशा देशी झाडांचे वृक्षारोपण करुन ,त्यांचे योग्य संवर्धन करणे गरजेचे आहे. ही झाडे वाढल्यास योग्य प्रमाणात पाऊस पडू शकतो त्यामुळे मुबलक पाणी मिळते, ऑक्सिजन मिळतो. या झाडांमुळे भूजल पातळी वाढण्यासही मदत होते.
एकंदरीत पर्यावरणातील वेगवगेळ्या अडचणींवर मात करण्यासाठी वनांची लागवड आणि संवर्धन करणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन, संवर्धन करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करूया असे मनाशी बाळगून अर्जुनी मोरगांव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबी वनसंवर्धन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या हातामध्ये झाडांचे रोपटे देऊन वनसंवर्धन म्हणजे काय व वनसंवर्धन कशाला म्हणतात प्रात्यक्षिक करून त्याचे महत्त्व सांगून, गावातील नागरीकांना वनसंवर्धन दिनाविषयी विशेष माहिती होऊन जनजागृती होण्यासाठी गावातील प्रमुख मार्गाने बॅंन्डच्या आवाजात विद्यार्थ्यांच्या हातामध्ये झाडांचे रोपटे व वनसंवर्धनाविषयी मुख्य माहितीचे चार्ट देऊन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळेचे प्राध्यापक काळसर्पे मॅडम, शिक्षक अरविंद ऊके, डाकराम बावणे, नागपूरे, हटवार,शिक्षिका काशिवार मॅडम तसेच विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.