राजकीय

बरडटोली प्राथमिक शाळेला जि.प.उपाध्यक्ष गणवीर यांची भेट

* वर्गखोली त्वरीत बांधुन देण्याचे आश्वासन

अर्जुनी मोर. :- तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचलेला आहे. अशातच अर्जुनी मोरगाव येथील बरडतोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही संपूर्ण पावसाखाली आली. त्यामुळे शाळेला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. ज्या खोल्यांमध्ये विद्यार्थी ज्ञानार्जन करीत होते त्या खोल्याही पावसाने तुडुंब भरल्या होत्या. अशा अवस्थेमध्ये शाळा काही दिवस बंद होती. सध्या तेथील शिक्षकांनी समाज मंदिरामध्ये तात्पुरती शिक्षणाची सोय केली आहे. बरडटोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचण्याची बऱ्याच वर्षाची परंपरा आहे. याबाबत सदर शिक्षकांनी ही बाब अनेकदा वरिष्ठांकडे पोहोचविली मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याने या गंभीर बाबीकडे लक्ष दिले नाही. आज या शाळेचे वर्ग समाज मंदिरामध्ये सुरू आहेत.
या गंभीर घटनेची दखल घेत गोंदिया जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती इंजि. यशवंत गणवीर यांनी आज 25 जुलै रोजी सदर शाळेला भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक पुनाराम जगझापे यांनी शाळेत येणाऱ्या पूर परिस्थितीची संपूर्ण माहिती उपाध्यक्ष गणवीर यांना दिली. यावेळी यशवंत गणवीर यांनी तात्काळ एक वर्ग खोली मंजूर करून देण्याचे आश्वासन देऊन येणाऱ्या काळात शाळा दुरुस्ती करून पूरमुक्त करण्याचे आश्वासन दिले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रतिराम राणे, माजी पंचायत समिती सदस्य दीनदयाल डोंगरवार व पत्रकार मंडळी उपस्थित होती.