शैक्षणिक

पालकांनी पाल्यांशी संवाद वाढवावा—प्राचार्य जे.डी.पठान

सरस्वती विद्यालयात शिक्षक-पालक सभेचे आयोजन

अर्जुनी मोरगाव: स्थानिक सरस्वती विद्यालयात वर्ग 5 ते 10 च्या पालक- शिक्षक संघ सभेचे आयोजन प्राचार्य जे.डी.पठान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सत्र 2024-25मधील या पहिल्या पालक शिक्षक सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून ठराव घेण्यात आले.सर्वप्रथम सत्र 2023-24 मधील एस.एस.सी. व एच.एस.सी. परीक्षेच्या निकालाबाबत माहिती सांगून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यानंतर सत्र 2024-25 करिता पालक-शिक्षक संघाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. कार्यकारणीत विद्यालयाचे प्राचार्य हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. सचिव म्हणून उपप्राचार्य छाया घाटे, सहसचिव म्हणून वर्ग 5 ते 7 साठी मनीषा सोपान शेकडे तर वर्ग 8 ते 10 साठी योगेंद्र ब्राह्मणकर व 11ते 12 साठी श्री. मुकेश हत्तीमारे यांची उपाध्यक्ष तर सहसचिव म्हणुन अरुणा झोडे, व अनिल परशुरामकर यांची निवड करण्यात आली.तसेच प्रत्येक वर्गातून एक पालक सदस्य व वर्गाचे वर्गशिक्षक यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यानंतर सत्र 2024-25 साठी तयार करण्यात आलेल्या शालेय व सहशालेय उपक्रमाच्या नियोजनास मंजुरी तसेच परीक्षांचे नियोजन सोबतच ईबीसी, पिटीसी, स्कॉलरशिप फार्म सादर करण्याविषयीची माहिती पर्यवेक्षिका छाया घाटे यांनी दिली. तसेच वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन क्लासेस ची माहिती सभेमध्ये देण्यात आली.बाहेरगावाहून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय बस बाबत माहिती सभेमध्ये देण्यात आली. तसेच एलिमेंट्री व इंटरमिजिएट या ड्रॉइंगच्या परीक्षेबाबत सविस्तर माहिती सभेमध्ये देण्यात आली. या सभेमध्ये प्रामुख्याने वर्ग 11 व 12 करिता नव्याने सुरू करण्यात आलेल्या NEET,JEE या वर्गांबद्दल प्रा. बिसेन सरांनी पालकांच्या शंकांचे निरसन केले. अध्यक्ष प्राचार्य जे.डी.पठान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पालकांना संबोधित करताना सांगितले की,मुलांच्या बालमनावर घरातूनच संस्कार होत असतात, त्यामुळे पालकांनी पाल्यांशी संवाद वाढवावा असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कुंडलिक लोथे यांनी तर आभार मुकेश शेंडे यांनी मानले. सभेसाठी सर्व शिक्षक वृंदांनी सहकार्य केले.