शैक्षणिक

उपक्रमशील शिक्षक सु.मो.भैसारे जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने पुरस्कृत

गोंदिया :- राष्ट्राच्या जडण -घडणीत शिक्षकाचे अतिशय मोलाचे स्थान असून एक सक्षम व निकोप समाज निर्मिती करण्याचे काम शिक्षकांकडून होत आहे याची जाण ठेवून संपूर्ण देशात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते .जिल्हा परिषद गोंदिया द्वारे आयोजित शिक्षक दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील उपक्रमशील, अभ्यासू व गुणवत्ता विकासासाठी सातत्याने धडपड करणाऱ्या शिक्षकांच्या गौरव समारंभ आयोजित करण्यात येतो.त्यामध्ये सु.मो.भैसारे पदवीधर शिक्षक असून, ते समूह-साधन केंद्र-अर्जुनी/मोर व शिक्षण विस्तार अधिकारी बीट-अर्जुनी/मोर चा अतिरिक्त कार्यभार सक्षमपणे सांभाळीत आहेत.त्यांच्या उपक्रमशीलतेची व कार्य तत्परतेची जाण ठेऊन, त्यांचे नाव सदर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात शिफारस करण्यात आली.त्यांना मिळालेल्या पुरस्काराने ते पुन्हा नव्या जोमाने कार्य करतील व राष्ट्र जडणघडणीत सहकार्य करतील, असा आशावाद आहे.
गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण अर्जुनी/मोर

सालेकसा तालुक्यातील अगदी लहानसे गाव भंसुला या ठिकाणी अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षी प्राथमिक शिक्षक पदावर रुजू होऊन, अनुभवाचे कसलेच गाठोडे नसतानाही ,सुरवातीलाच नवीन शाळा उघडून तिथे शिक्षक व मुख्याध्यापकाची भूमिका सक्षमपणे सांभाळून , विद्यार्थी व पालकांच्या मनात घर करून बसणारे सु.मो.भैसारे यांना गोंदिया जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने , शिक्षक दिनानिमित्त पुरस्कृत करून गौरविण्यात आले.
पंचायत समिती सालेकसाचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी एम. व्ही.मसराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सालेकसा येथील भनसुला या छोट्याशा गावी पदभार स्वीकारलानंतर जेमतेम १२ विद्यार्थी पहिल्या वर्गात प्रवेश घेतले होते .सुरवातीच्या तीन महिन्याच्या काळात विद्यार्थी स्खलित वाचन ,लेखन व गणितीय क्रिया आकलन, अल्पावधीत मुलांच्या गुणवत्तेमध्ये बदल झाल्याचे पाहून, एक शाबासकीची थाप दिली आणि ती पहिली प्रेरणा व आनंद व्यवसायाशी प्रामाणिक राहून ,कार्य करण्याची नवीन उर्मी निर्माण केली आणि त्याचीच परिणती म्हणजे तब्बल अखंडित सेवेच्या ३२ वर्षानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया यांनी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिला त्याचा मला अभिमान वाटतो असे मनोगत याप्रसंगी सु .मो. भैसारे यांनी व्यक्त केले.
जवळपास आठ वर्षे पंचायत समिती सालेकसा , पंचायत समिती देवरीला एक वर्षे, तर पंचायत समिती अर्जुनी मोर येथे तब्बल २३ वर्षे अध्ययन- अध्यापनाचे ते कार्य पार पाडीत आहेत.
त्यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करून, गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न केले . मानव समाजाला आपले काही देणे लागते ही भावना जपून, तब्बल दहा वेळा रक्तदान करून, सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केले.त्याचबरोबर विविध संघटनात्मक परखडपणे भूमिका पार पाडून,न्याय हक्कासाठी लढवय्ये सुमो सर म्हणून त्यांची जिल्ह्यात ठसा उमटवला आहे.याशिवाय विविध सामाजिक कार्यात उपस्थित राहून, समाजप्रबोधन करण्यासाठी ते सदैव तत्परता दाखवीत असतात.

शिक्षक-विद्यार्थी-पालक-समाज यांच्या समनव्ययातून शाळेला भौतिक सुविधा उपलब्द्ध करून,विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी ते सदैव धडपडत असतात.त्यांच्या कार्य कुशलतेची जाण ठेऊन, गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी समूह साधन केंद्र-अर्जुनी/मोर चे केंद्रप्रमुख तसेच बीट अर्जुनी/मोर चे शिक्षण विस्तार अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभर सोपविला आहे ,असे असतांनाही त्यांनी कार्यरत शालेय वेळेत उपस्थिती व अध्ययन-अध्यापन कार्यात कधीही खंड पडू दिला नाही ही उल्लेखनीय बाब दिसून येते. शालेय प्रगतीबरोबर, स्नेहसंमेलन, पिकनिक, वनभोजन, क्रीडा, अशा विविध सहशालेय उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत असतात.यात त्यांचे मुख्याध्यापिका रेखा गोंडाने व सहकारी शिक्षकांच्या प्रयत्नातून गावची शाळा-आमची शाळा-२०२३, मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा-२०२३या सारख्या उपक्रमात विशेष नाविन्यपूर्ण कामगिरी करून स्पर्धेत मानाचे स्थान मिळविले आहे.त्याची परिणती म्हणजे आजच्या घडीला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथे १०किमी अंतरावर असलेल्या महालगाव,नजीकच्या निलज, बरडटोली, अर्जुनी/मोर चे विद्यार्थी सदर शाळेत प्रवेश घेत आहेत व सातत्त्याने पटसंख्या वाढ होत असल्याचे दिसत आहे. शाळेचे हे बदलणारे रूप ,यासाठी सदर शाळेत कार्यरत संपूर्ण शिक्षकवृंद यांचे परस्पर समनव्यय व विद्यार्थी निष्ठा कारणीभूत असून, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार -२०२४ या शाळेला समर्पित करीत असल्याची भावना याप्रसंगी सु.मो.भैसारे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज भाऊ रहांगडाले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत भाऊ गणवीर गोंदिया जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथम महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुरम पुराम समाज कल्याण सभापती पूजा अखिलेश शेठ जिल्हा परिषद गोंदिया चे गटनेता लायकराम भेंडारकर,शिक्षणाधिकारी( प्राथमिक)सुधीर महामुनी,शिक्षणाधिकारी(माध्य),डॉ.महेंद्र गजभिये, डायटचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य ,उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे ,ज्ञानेश्वर दिघोरे, शिक्षण विभागाचे कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.