मुख्यमंत्री माझी- शाळा सुंदर शाळा टप्पा -२ ‘ मध्ये जि.प.मोरगाव,शाळेचे जिल्ह्यात तृतीय स्थान
अर्जुनी मोरगाव :- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा टप्पा -२ हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबविण्यात येत असून, सदर अभियानातंर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ,मोरगाव यांनी सुरुवातीपासून सक्रिय सहभाग घेऊन शाळेत शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विविध भौतिक साधनांची उपलब्धता करून, तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्हा स्तरावर तृतीय स्थान पटकावून तालुक्याला गौरवाचे स्थान प्राप्त केलेले आहे .
या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक ,शिक्षणप्रेमी,ग्रामपंचायत मोरगाव व नागरिकांनी भरभरून सहकार्य करून, ग्राम पातळीवर दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शाळा निर्मितीसाठी हातभार लावला.
शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये सुद्धा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव पंचायत समिती- अर्जुनी/ मोर यांनी अदानी फौंडेशनच्या ‘ आमची शाळा-सुंदर शाळा ‘उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन तालुका पातळीवर प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले होते. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा टप्पा -१ मध्ये तालुक्यात तृतीय स्थान मिळविले होते हे विशेष. सदर अनोखे स्पर्धात्मक अभियान उपक्रमाची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ‘मध्ये झालेली होती.
सदर उपक्रमाची जिल्हा पातळीवर मूल्यांकन करण्यासाठी शिक्षणाधिकारी( प्राथमिक )सुधीर महामुनी, उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण चव्हाण व पौर्णिमा विश्वकर्मा मॅडम यांनी प्रत्यक्ष मूल्यांकन करून विद्यार्थ्यांचे गुणवत्ता विषयक व भौतिक सुविधांची उपलब्धतेबाबतची माहिती जाणून घेतली. शालेय परिसर, शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधा ,विद्यार्थ्यांची गुणवत्ता यावर समाधान व्यक्त केले असून, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग घडवून विद्यार्थ्यांना पूरक असे मार्गदर्शन करण्यात यावे व अधिकाधिक विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी दिले.
सदर उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याध्यापक रेखा गोंडाणे केंद्रप्रमुख सु.मो. भैसारे, विषय शिक्षक पी. टी. गहाणे, व्ही. बी. भैसारे ,जे. एन. ठवकर, वामन घरतकर,आर. पी. उईके, अचला कापगते, रूपाली मेश्राम, ऋषीश्वर मेश्राम यांनी यथोचित प्रयत्न केले. जिल्हा स्तरावर शाळेचे लौकिक केल्यामुळे सरपंच गीता नेवारे, पंचायत समिती सभापती सविता कोडापे,जिल्हा परिषद सदस्या कविता कापगते,उपसरपंच उमाकांत पालिवाल, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश लाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी लोदी ,पोलीस पाटील रमेश झोडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सोनूताई कराडे, सदस्य मुनेश्वर शहारे ,ग्रा.पं. सदस्य विद्या शहारे, पद्मिनी चचाने,मुरारी उईके, देवानंद शहारे,अंगणवाडी सेविका शीला वासनिक आदिंनी शालेय प्रशासनाचे व शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले.
– मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा टप्पा -२ हा एक अभिनव उपक्रम असून शाळेचा गुणवत्ता व भौतिक सुविधेची उपलब्धता निर्माण व्हावे . शाळेत दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाला राबविलेला उपक्रम अभिनव असून, ही स्पर्धा संपूर्ण राज्यामध्ये होत आहे यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व शाळेच्या भौतिक सुधारण्यासाठी सदर शाळेत बदल झाल्याचे दिसून येत आहे. गुणवत्ता विकासासाठी केलेले प्रयत्न व भौतिक साधनांची उपलब्धता यामुळे अपेक्षित बदल झाल्याचे दिसत आहे.
– सुधीर महामुनी शिक्षणाधिकारी जि. प.गोंदिया