शैक्षणिक

पंचशील विद्यालय बाराभाटी येथे महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन..!

बोडगांव देवी :- अर्जुनी मोरगांव तालुक्यातील पंचशील विद्यालय बाराभाटी येथे दिनांक ६ डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे कैवारी, मूकनायक, भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. प्रथमत: शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक डी एच मेश्राम यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी पुष्प वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सहाय्यक शिक्षिका डी एस भैसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक त्रिशरण च्या माध्यमातून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बाबासाहेब व संविधान या विषयावर आधारित भाषण, गीत गायन, एकपात्री नाट्य व प्रश्नमंजुषा स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेत शाळेतील तब्बल ६० ते ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धक बाबासाहेबांचे जीवन कार्य, समाजासाठी केलेले संघर्ष व त्याग तसेच संविधानाचे महत्त्व आपल्या वाणीतून उत्कृष्टपणे मांडत परीक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. देवयानी किरसान या विद्यार्थिनीने तर बाबासाहेब आंबेडकर या एक अन एक अक्षराचा अर्थ आपल्या भाषणातून मांडले. तर वर्ग सातवी ची विद्यार्थिनी आराध्या रंगारी हिने एकपात्री नाट्य सादर करीत बाबासाहेबांच्या समाजकार्यात रमाबाईंनी दिलेली साथ व संघर्ष उत्कृष्टपणे मांडत सर्वांना रमाबाई ची महती पटवून दिली. तसेच बऱ्याच स्पर्धकांनी गीत गायनाच्या माध्यमातून संगीतमय व भावनिक वातावरण तयार करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धकाबरोबर सांस्कृतिक प्रमुख टि.के भेंडारकर यांनी हार्मोनियमच्या सहाय्याने सुमधुर गोड अशा आवाजानी विद्यार्थ्यांची मन जिंकली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या नियोजनाकरिता आलेले पंचायत समिती अर्जुनी मोरगावचे गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण व केंद्रप्रमुख नाजुकराम लंजे यांनी बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण व आई-वडिलांचे महत्त्व पटवून दिले. शाळेतील मुख्याध्यापक व्ही एम चव्हाण, सहाय्यक शिक्षक डी एच मेश्राम व आर डी कोल्हारे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रेक्षक म्हणून सर्व विद्यार्थी कानाचे डोळे करून ऐकत होते. सहाय्यक शिक्षक एस सी पुस्तोडे यांनी प्रश्नमंजुषा ही स्पर्धा उत्कृष्ट, नियोजनबद्ध, मनोरंजनात्मक पद्धतीने संचालन करीत यशस्वीरीत्या पार पाडली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एन.एस नंदागवळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक जे.एम दोनाडकर व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.