महापरिनिर्वाण दिनी विद्यार्थी नीलकमल गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. मेश्राम यांचे उपक्रम
-रत्नदीप विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सडक अर्जुनी :- येथील नीलकमल स्मृती फाऊंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चिखली येथील रत्नदीप विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नीलकमल स्मृती प्रीत्यर्थ तीन विद्यार्थ्यांना ‘नीलकमल स्मृती गुणवत्ता पुरस्काराने’सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल. एम. पातोडे होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुनी मोरगाव चे उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे, ,डुग्गीपार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पी.डी. बांबोळे, सडक अर्जुनीच्या नायब तहसीलदार प्रेरणा कटरे, राजीव गांधी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. राजकुमार भगत, चिखली केंद्राच्या केंद्रप्रमुख करुणा वासनिक,रत्नदीप विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक ए. बी.बोरकर, पत्रकार शाहिद पटेल, नीलकमल स्मृती फाऊंडेशनचे आयोजक आर. व्ही.मेश्राम आदी उपस्थित होते.
यावेळी मार्च २०२४ मध्ये शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता दहावी) विद्यालयातून प्रावीण्यासह प्रथम क्रमांक पटकविणारा विद्यार्थी गणेश महेश बोरकर, द्वितीय क्रमांक पटकविणारी विद्यार्थीनी कु. हिमांशी अरविंद भांडारकर व तृतीय क्रमांक पटविणारी विद्यार्थिनी कु.काजल ज्ञानेश्वर कोरे यांना नीलकमल स्मृती फाउंडेशनचे आयोजक आर. व्ही. मेश्राम व आयोजिका प्रज्ञा मेश्राम यांच्याकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, संविधान पुस्तक, पुष्पगुच्छ व रोख पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी वरूणकुमार शहारे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आजचे स्पर्धेचे युग आहे. योग्य करिअर घडवावयाचे असेल तर चांगली सवय लावा.पाया पक्का असेल तर भविष्याची इमारत उभी राहील. वाचन करा.फॉर्मॅलिटी म्हणून शिक्षण घेवू नका.दीर्घकालीन दूरदृष्टीचा अभ्यास करा. चांगले यश संपादन करून आई-वडिलांचे स्वप्न साकार करा.’
यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. राजकुमार भगत यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनो तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असून डॉ. बाबासाहेबांचे विचार अंगीकरावे असे सांगितले.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांनी आपले विचार तसेच विद्यार्थ्यांनी गीत व भाषण सादर केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी
आपल्या मार्गदर्शनातून सदर उपक्रमाची प्रसंशा केली.
प्रास्ताविक आयोजक आर. व्ही. मेश्राम यांनी करून फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एस. बी. मेंढे यांनी केले तर आभार शिक्षिका कु. जयश्री कढव यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक पी.एच. पटले, एच. ए.लांडगे, रीना पर्वते,यादवकुमार कोरे, मुकेश शिवणकर, लक्ष्मी कोरे, उज्वला भेंडारकर व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.