गुन्हेगारी बातमी

जिल्हा परिषद शाळेच्या विहिरीत पडला बकरा..,स्थानिक प्रशासन मात्र दुर्दैवी घटना घडण्याच्या प्रतीक्षेत..!

गोंदिया :- जिल्हा परिषद शाळा टेमनी च्या लगत असलेली विहीर शाळेच्या विद्यार्थ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेली विहीर अतिशय जीर्ण झालेली असून मुख्य रस्त्यालगत असल्याने अत्यंत धोकादायक बनलेली आहे. त्या धोक्याची शक्यता शेवटी पूर्णत्वास आली व त्या विहिरीमध्ये कठळे नसल्यामुळे गावातीलच शेतकऱ्याचा बकरा त्या विहिरीत बुडून चक्क दोन दिवस पाण्यातच राहिला व शेवटी त्याला बाहेर काढण्यात आले. या घटनेला आठवड्यापेक्षा अधिकच्या वेळ निघून गेला तरी अद्याप प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही.

याच विहिरीच्या लगत जिल्हा परिषदेची शाळा असल्याने शेकडो विद्यार्थी त्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी जातात चुकूनही एखाद्या विद्यार्थ्याच्या सोबत अनपेक्षित घटना घडू नये असा आशावाद सामान्य जनता बाळगून आहे मात्र, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व तेथील पदाधिकारी अशा प्रकारच्या होत असलेल्या गंभीर समस्येपासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे त्या जीव घेण्या विहिरीपासून चिमुकल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा करणार कोण? असा प्रश्न तेथील पालक वर्गाला पडलेला आहे.

स्थानिक प्रशासनाकडे विविध योजनेच्या मार्फत शाळेच्या भौतिक सुख सुविधांसाठी व डागडुजी करण्यासाठी लाखोच्या संख्येने निधी उपलब्ध असतो मात्र त्याकडे स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तेथील पालकांनी बोलून दाखवला आहे. याविषयी अधिक माहिती करिता ग्रामपंचायत अधिकारी यांना शासकीय वेळेत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रशासनाचा हा दुर्लक्ष कोणत्याही वेळी एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवावर बेतू शकतो यात तीळमात्र शंका करता येणार नाही.

यापुढे प्रशासन पुन्हा एखादी दुर्दैवी घटना घटनेची वाट पाहणार की कामाला लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मिळालेल्या माहितीच्या आधारे सरपंच व तेथील प्रशासन इतर छोटे मोठे काम उत्सुकतेने पार पाडतात मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अतिशय गाफील असल्याची माहिती आहे. जे प्रशासन स्थानिक नागरिकाच्या सुरक्षेविषयी गंभीर नाही अशा प्रशासनाची गरज तरी काय? हे प्रशासन ग्रामपंचायत अधिकारी च्या नावाच्या पाट्या चमकवण्यात व्यस्त आहेत मात्र यापुढे तरी ग्रामीण जनतेच्या गंभीर समस्येच्या दाखला घेत कार्यरत राहतील अशी अपेक्षा ग्रामीण नागरिकांनी बोलून दाखवली आहे.