पंचशील विद्यालयात चित्रकला व निबंध स्पर्धेच्या माध्यमातून जागतिक वन दिनाचे महत्त्व पटवून दिले..!
अर्जुनी मोरगाव :- तालुक्यातील पंचशील विद्यालय बाराभाटी येथे दि.२१ मार्च २०२५ रोजी जागतिक वन दिनानिमित्ताने सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अर्जुनी मोरगाव लागवड अधिकारी प्रियंका बनसोड, वनपाल एस ए घुगे, वनरक्षक एम.एस चांदेवार, एम बी खोब्रागडे तसेच ग्रामपंचायत बाराभाटी सरपंच सरस्वता चाकाटे, शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम चव्हाण, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वन विभागाचे कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रम घेण्यात आले.
वन्यजीव सुरक्षा या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी चित्रकला स्पर्धेत प्रथम विक्रांत ताराम, द्वितीय अक्षरा सुखदेवे तर तृतीय वैशाली मेश्राम आणि निबंध स्पर्धेत प्रथम भाविक लटाये, द्वितीय तन्मय तागडे तर तृतीय अनुशील मेश्राम यांनी क्रमांक पटकाविले. या विद्यार्थ्यांचे सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अर्जुन मोरगाव मार्फत बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आले.
तसेच हरितसेना प्रमुख एल एम पाटणकर यांच्या नेतृत्वात पर्यावरण जनजागृती करिता प्रभात फेरी तर सहाय्यक शिक्षक एस सी पुस्तोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सर्वांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आले. लागवड अधिकारी प्रियंका बनसोड यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव व पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. तर वनरक्षक खोब्रागडे यांनी वनवा पेटवल्याने होणारा दुष्परिणाम व झाडे लावल्याने मिळणारा सुखद आनंद विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक प्रमुख टी के भेंडारकर तर आभार ए डी घानोडे यांनी मानले. चित्रकला व निबंध स्पर्धा परीक्षणाचे काम परीक्षा प्रमुख एन पी समर्थ व हरित सेना प्रमुख पाटणकर यांनी पार पाडले. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अर्जुनी मोरगाव यांचेकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली.