अपघात

मोहफुल वेचणाऱ्या महिलेवर पट्टेदार वाघाचा हल्ला, महिला ठार..! शिवरामटोला जंगल परिसरातील घटना

अर्जुनी-मोर.:- तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालय आणि वनविकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या शिवरामटोला नाजिक सकाळच्या सुमारास मोहफुले संकलन करीत असलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज (दि.२३)रोजी घडली आहे.वाघाच्या हल्यात मृत झालेल्या महिलेचे नाव अनुसया धानु कोल्हे (वय अंदाजे ५०) रा. शिवरामटोला असे आहे.
घटना स्थळावरील माहितीनुसार मृतक महिला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान गावानजीक असलेल्या वन विकास महामंडळाच्या ( कक्ष क्र.३३२) जंगल परिसरात मोहफुले संकलन करीत असताना दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने महिलेच्या पाठीमागून हल्ला करून तिला अंदाजे १०० मीटर अंतरावर फरफटत नेले. व जवळच असलेल्या पहाडीच्या पायथ्याशी मृत महिलेच्या जवळ तीन तासापर्यंत तळ मांडून बसला असल्याची माहिती आहे. घटनेची माहीती मिळताच गावातील नागरिक मोठ्या संख्येने घटना स्थळी आले. त्यामुळे लोकांना अगदी जवळून वाघाचे दर्शन घेता आले.घटनेची माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी,आणि वनविकास महामंडळाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले .या घटनेमुळे शिवरामटोला गावात शोक कळा पसरली असून नागरिकांनी जंगलात एकटे न जाण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
घटना वनविकास महामंडळ हद्दितील असल्याने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.बातमी लीहीपर्यंत वनविभाग आणि वनविकास महामंडळाने काय कार्यवाही केली ही माहिती मिळू शकली नाही.
घटनेची माहीती आमदार राजकुमार बडोले यांना सकाळीच प्राप्त झाली.लगेच त्यांनी वनविभाच्या वरिष्ठ अधिका-यांना भ्रमणध्वनीवरुन माहीती देवुन तातडीने घटनास्थळी जावुन चौकशी करुन वाघाचा बंदोबस्त करण्याच्या सुचना दिल्या.व मृतक महिलेच्या कुटुंबियांना तातडीने मदत व मोबदला देण्याचे सुचना करुन मृत महिलेच्या कुटुंबा विषयी शोक व्यक्त केला.