उपवनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरातच लागलेल्या वनव्यामुळे औषधी वनस्पतींचे संरक्षणावर लागले गालबोट..!
राज डाहाट /गोंदिया :- वनपरिक्षेत्र गोंदियाच्या हद्दीत कुड़वा येथे औषधी वनस्पतीची रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत मार्च महिन्याच्या सुरुवातीस विविध ठिकाणी तीन वेळा भीषण आग लागून नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश झालेला आहे. या क्षेत्रात आवळा, निलगिरी, बेहडा, हीरडा अशा अनेक औषधी वनस्पतींची झाडे आहेत. तसेच इतर झाडांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. या लागलेल्या आगीत सदर जंगलाचे जळजळ पंधरा ते वीस हेक्टर भाग जळालेला आहे. विशेषतः या भागात आवार भिंतीचे सुद्धा आवरण आहे तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणात जंगलाची नासाडी होण्यास कारणीभूत कोण? याविषयी अधिक माहिती करिता क्षेत्र सहाय्यक दीपक कडू यांना विचारले असता “एक ते दीड हेक्टर जंगल जळाले आहे तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आले” असे सांगितले.
संरक्षित जंगलाची इतक्या मोठ्या प्रमाणात नासधूस होणे व त्यातून उपलब्ध असलेली जैवविविधता नष्ट होणे यासारख्या अनेक घटना जंगल परिसरात घडत चाललेले आहेत तरी देखील स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा या घटनांकडे कानाडोळा होत असल्याचे चर्चा परिसरात जोर धरू लागल्या आहेत. अगदी याच परिसरात जिल्ह्यातील उपवनसंरक्षकांचा कार्यालय देखील आहे. तरी वनव्यांच्या अशा वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी विभागाकडे काही ठोस उपाययोजना आहेत का? असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात घर करू लागला आहे.
वन विभागामध्ये वनव्याच्या घटना अतिशय संवेदनशील समजल्या जात असून अशावेळी दोष सिद्ध झाल्यास तात्काळ निलंबनाची कारवाई देखील केली जाते अशी माहिती आहे. वनांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वनविभागाच्या महत्त्वपूर्ण कृती आराखडा तयार करण्यात येतो. मात्र गोंदिया वनपरिक्षेत्रातील हद्दीत त्या आराखड्याचे पालन होताना दिसत नाही असे खेदाने म्हणावे लागेल. वरिष्ठ अधिकारी याविषयी काही कृती करतील का याकडे जनसामान्यांचे लक्ष लागून आहे…. क्रमशः