अस्तित्व टिकवण्याच्या झुंजित एका वाघाचा मृत्यू..! प्रतिस्पर्धी वाघाच्या खुणा आढळल्या..
गोंदिया :- चिचगड वनपरिक्षेत्रातील मालकाझरी क्षेत्रातील कक्ष क्रमांक 802 राखीव वनामध्ये (दि. 28 मार्च) रोजी सकाळी आकडा वाजे दरम्यान वन विभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून शासकीय नियमानुसार मृत वाघाचे शव विच्छेदन करून त्याचा अंत्यविधी पार पाडला. यावेळी प्रमोद पंचभाई उपवनसंरक्षक वन विभाग गोंदिया, अविनाश मेश्राम सहायक उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी चिंचगड, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी एन एन टी आर साकोली, सावन बहेकार, मुख्य वन्यजीव रक्षक यांचे प्रतिनिधी रुपेश निंबार्ते, एन टी सी ए चे प्रतिनिधी तसेच पंच व इतर अधिकारी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
प्राथमिक अहवालानुसार वाघाचा मृत्यू हा चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असल्याचे घटनास्थळावरून दिसून आले. वाघाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून मृत वाघाच्या मानेवर व चेहऱ्यावर दुसऱ्या वाघाची सुडे दातांची निशाण असल्याचे दिसून आले. तसेच सदर क्षेत्रात 300 ते 400 मीटर परिसरात सविस्तर पाहणी केली असता वाघाचे मृतदेह हे झुंज झाल्याच्या स्थळापासून 200 ते 300 मीटर अंतरावर नैसर्गिक पाणवड्याकडे ओढत नेल्याच्या खुणा सुद्धा दिसून आल्या आहेत. वाघाच्या मागील पायाचा भाग हा दुसऱ्या वन्य प्राण्याने खाल्ले असून जागेवर हाडे शिल्लक असल्याची दिसून आले.
सदर वाघाच्या मृत्यूप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी चिचगळ यांच्याकडून वन गुन्हा नोंदवण्यात आलेला असून पुढील प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी अविनाश मेश्राम नवेगाव बांध तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी चिंचगड यांच्या स्तरावर सुरू आहे.