General

गोरेगाव तालुक्याने “आशा दिवस ” निमित्ताने केला आशा सेविका व गट प्रवर्तकांचा सत्कार

गोरेगाव /गोंदिया :- राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अंतर्गत आशा दिवस साजरा करणे महत्त्वाचे आहे, कारण या दिनी आपण मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या (आशा) यांच्या कार्याची नोंद घेतो, ज्यांच्या मदतीने माता आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा होते, तसेच ग्रामीण भागात आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचते. आशा स्वयंसेविका हे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचे महत्त्वपूर्ण अंग आहेत. त्या माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आणि माहिती लोकांना पुरवतात. (दि. 27 मार्च) रोजी गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांच्या कल्पक विचारातुन पंचायत समिती सभागृहात आशा दिवस समारंभ संपन्न झाला.

कार्यक्रम उद्घाटक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती सुरेशजी हर्षे, कार्यक्रम अध्यक्ष पंचायत समिती सभापती चित्रलेखाताई चौधरी तर प्रमुख उपस्थिती अर्थ व बांधकाम सभापती डॉ.लक्ष्मणजी भगत,पंचायत समिती उपसभापती रामेश्वरजी महारवाडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,गटविकास अधिकारी एच.व्ही.गौतम, गटशिक्षणाधिकारी एम.डी.पारधी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.आशा सेविका यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणुन रांगोळी स्पर्धा,गायन स्पर्धा, तसेच समुह गान स्पर्धा यावेळी प्रस्तुत करण्यात आले.यावेळी गोरेगाव तालुक्यातील आशा सेविका व गट प्रवर्तकांचा सत्कार करण्यात आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी दिली आहे.

यावेळी आरोग्य व शिक्षण सभापती सुरेशजी हर्षे यांनी आशा कार्यकर्त्यांमुळे लोकांना आरोग्य सेवा सोप्या आणि सहज उपलब्ध होतात, ज्यामुळे गरीब आणि दूरच्या भागातील लोकांनाही आरोग्य सुविधा मिळतात. आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने लोकांना आरोग्य, स्वच्छता आणि कुटुंब नियोजन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांबद्दल माहिती मिळते आणि जागरूकता वाढत असल्याची माहीती दिली तर आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने मातांना प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण आणि स्तनपानाचे महत्त्व यांसारख्या बाबींची माहिती मिळते, ज्यामुळे माता आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा होते. आणी म्हणुनच आशा दिनी आपण आशा कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरव करतो आणि त्यांना प्रोत्साहन देत असल्याची माहीती डॉ.विनोद चव्हाण यांनी दिली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका आरोग्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी केली.