शैक्षणिक

जाण्या-तिम्या शाळेतील वीज पुरवठा खंडित, ऐन परीक्षेच्या वेळी सोयी सुविधा वाऱ्यावर..!

गोरेगाव /गोंदिया :- शहीद जान्या तीम्या शाळा गोरेगाव ही जिल्ह्यातील सुपरिचित शाळा म्हणून ओळखली जाते आहे. या शाळेत विविध शासकीय कला, क्रीडा, साहित्य व इतर विषयाशी संबंधित अनेक कार्यक्रम पार पडतात. ही शाळा जिल्ह्यातील जुन्या शाळांपैकी एक असून शाळेला पराक्रमी शहिदांचा इतिहास आहे. आजही या शाळेत सुमारे 1100 पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्या सुविधेसाठी विज, पंखा, आरोच पाणी इत्यादी सोयी सुविधा असल्या तरी सदर विद्युत उपकरण चालवण्यासाठी लागणारा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने बातमीच्या चर्चेचा विषय बनला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शाळेत दोन विद्युत मीटर लागून आहेत. त्यापैकी एक मागील सहा महिन्यापासून बंद आहे तर दुसरा सोलर सिस्टम सी जुळलेला आहे. नवीन मीटरने वर्ग खोल्यांमध्ये वीज पुरवठा होतो तर जुन्या मीटरने कार्यालयीन कामकाजासाठी मदत होते. हे जुने मीटर बंद होण्यासाठी मुख्याध्यापकांनी वेळोवेळी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांशी शाब्दिक चर्चा केली पण पत्रव्यवहार केला नाही.

जुना मीटर बंद असला तरी नवीन मीटरशी त्याला जोडून कार्यालयीन कामकाजासाठी उपयोग केले जात होते. ही बाब लक्षात येताच एम एस सी बी च्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला व वीज भरणा करण्यास सांगितले. सहा महिन्यापेक्षा अधिक चा काळ लोटला तरी विज बिल भरण्यात न आल्याने नाईलाजाने अखेर (दि. 28 मार्च) रोजी शाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

ऐन परीक्षेच्या वेळी शाळेतील वीज पुरवठा खंडित होण्यासारखी दुर्दैवी बाब आणखी कोणती असू शकेल. यावरून शाळेच्या व्यवस्थापनाचा अंदाज लावला जाऊ शकतो.

–जुन्या मीटरचं सिक्युरिटी डिपॉझिट वजा करून उर्वरित पैसे भरण्यास आम्ही तयार आहोत. याविषयी 28 मार्च रोजी पत्र देण्यात आलेला आहे.
प्राचार्य – प्रभाकर लोंढे

— सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून वीज बिल भरणा केलेला नाही प्राचार्यांची मानसिकता तशी दिसत नाही.
विनित वाहाणे, शाखा अभियंता MSEB गोरेगाव