विदर्भ

मेगा पाणलोट प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना गांडूळ खत बेडचे वितरण: सेंद्रिय शेतीला नवा संजीवनी स्रोत


देवरी, 1 एप्रिल – शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आणि मृदा आरोग्य सुधारण्यासाठी देवरी तालुक्यातील 67 गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भारत रुरल लाइवलीहूड फाउंडेशन, एक्सिस बँक फाउंडेशन आणि इंडियन ग्रामीण सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेगा पाणलोट प्रकल्प’ प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना गांडूळ खत बेड वितरित करण्यात आले, जे त्यांच्या शेतीसाठी सेंद्रिय खतनिर्मितीचा नवा स्रोत ठरणार आहे.

सेंद्रिय शेतीचा सुवर्णकाळ!
अंभोरा, निलज आणि देवलगाव या गावांमध्ये गांडूळ बेड वितरित करण्यात आले. सेंद्रिय शेती करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांनी यास मोठा प्रतिसाद दिला. यावेळी शेतकऱ्यांना गांडूळ खत तयार करण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.

गांडूळ खत – मृदेला नवसंजीवनी
शेतीशाळेच्या सत्रामध्ये तज्ज्ञांनी गांडूळ खत व्यवस्थापनाचे महत्त्व उलगडले. गांडूळ बेड कसा तयार करावा, योग्य प्रमाणात पाणी आणि जैविक कचरा वापरण्याची प्रक्रिया, तसेच गाळलेले खत मृदेत मिसळून उत्पादन वाढवण्याच्या तंत्राबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. एका गांडूळ बेडमधून 100 दिवसांत 7 ते 8 किलो उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते, जे जमिनीला अधिक सुपीक बनवते आणि उत्पादनवाढीस मदत करते.

या मध्ये आजीविका तज्ञ विकास मेश्राम यांनी गांडूळ खताच्या प्रभावी वापराबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “गांडूळ खताच्या नियमित वापरामुळे मृदेत जिवाणूंची संख्या टिकून राहते, पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये सहज मिळतात आणि शेती अधिक समृद्ध होते.” उपक्रमामुळे केवळ जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार नाही, तर पर्यावरणपूरक शेतीला मोठा हातभार लागेल. सेंद्रिय शेतीला गती मिळवून, शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्याच्या दिशेने हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे! त्यांच्या या मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी गांडूळ खत वापरण्याचा निर्धार केला.
कार्यक्रमाला रोजगारसेवक, स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ तसेच इंडियन ग्रामीण सर्विसेसचे क्लस्टर कोऑर्डिनेटर योगेश नैताम, डेटा संकलक प्रेशीत चचाने, राधेश्याम सलामे आणि नेहा वालदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

गावातील शेतकऱ्यांनी यास प्रकल्पास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, गांडूळ खत बेडचा उपयोग करून सेंद्रिय शेतीत अधिक भर घालण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर सेंद्रिय शेतीला चालना मिळेल, उत्पादनवाढ होईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सकारात्मक फरक पडेल, असा विश्वास लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त करण्यात आला.