…मोठ्याला सुट्टी! अन लहान्याने मारली दांडी..! सुट्टीच्या भ्रमात पालकसहित विद्यार्थी गोंधळले
राज डाहाट/गोंदिया :- सण उत्सवानिमित्त शाळांना लागणाऱ्या सुट्ट्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच! 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक शाळेत ध्वजारोहण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात दिवसभर सुट्टीची उत्सुकता राहतेच, मात्र यावर्षी दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला जन्माष्टमी निमित्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली पण प्राथमिक शाळांना ही सुट्टी नव्हती. योगायोगाने तो दिवस शनिवारचा असल्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शाळेची तयारी करत असतानाच घरातील किंवा परिसरातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याचे पाहून अनेक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी तसेच पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला व त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेला दांडी मारली.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत निर्गमित झालेल्या पत्रांमध्ये माध्यमिकला सुट्टी आहे पण प्राथमिक ला नाही योगायोगाने शनिवार आला त्यामुळे ह्या सुट्ट्यांचा निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी आपसात संगनमताने सुट्टीचा निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र तसे घडले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी शनिवारच्या शाळेला मुकले.
यापूर्वी सुद्धा दिनांक 12 ऑगस्ट रोजी निघालेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने निघालेल्या पत्राच्या अनुषंगाने दिनांक 13 व 14 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ही शाळेची वेळ दिली तर साडेसात वाजता झेंडावंदनाची वेळ दिली त्यातही दुपारी सव्वा दोन वाजेपर्यंत विविध कार्यक्रम घेण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना बसवण्याच्या सूचना त्या पत्रान्वये देण्यात आल्या. या पत्राच्या अनुषंगाने सुद्धा शिक्षण विभागात सगळीकडे विशेष अशा चर्चा आहेत त्याला कारण हेच की, पूर्वी शाळा उघडायची का झेंडावंदन करायचा, मग आठ वाजे विद्यार्थी येणार असतील तर साडेसातच्या झेंडावंदनाला उपस्थित राहणार कोण शिक्षक की विद्यार्थी..? यावेळी राष्ट्रीय ध्वजसंहिता कशाप्रकारे पाळण्यात आली हे विशेष.या पत्राच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शिक्षकांनी कशाप्रकारे “हर घर तिरंगा या अभियानाची” अंमलबजावणी केली याचे उत्तर त्यांनी प्रशासनाला कसे दिले हे ज्याचे त्यांनाच माहीत. या गोंधळात काही शाळांनी सुट्टीच घोषित केली अशी माहिती आहे. तेव्हा अशा शाळांवर शिक्षण विभाग कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सुट्ट्यांच्या बाबतीत कोणत्याही गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मला सूचना मिळाली नाही…. सुधीर महामुनी प्राथमिकशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद.
