नेत्रदान म्हणजे नवजीवन! नेत्रदान पंधरवड्याच्या समारोप कार्यक्रमात समाजजागृती करणाऱ्यांचा सन्मान
गोंदिया :- “एक नेत्रदान, अनेक स्वप्नांना उजाळा” या प्रेरणादायी विचाराने दि.25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 दरम्यान साजऱ्या झालेल्या नेत्रदान पंधरवड्याचा समारोप सोहळा केटीएस हॉस्पिटल येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.या विशेष कार्यक्रमात नेत्रदानासाठी कार्य करणाऱ्या आणि समाजात जनजागृती घडविणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व सत्कार करण्यात आला.नेत्रदान पंधरवड्यात दोन व्यक्तींनी नेत्रदान करून समाजात एक नवी दिशा दाखवली
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले नेत्रमित्र नरेश लालवानी यांचा सत्कार, जो जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांच्या हस्ते करण्यात आला.नरेश लालवानी हे गेली अनेक वर्षे नेत्रदान जनजागृतीमध्ये सक्रिय असून, समाजाला सतत प्रेरणा देत आहेत.
कार्यक्रमात धोटे बंधू महाविद्यालयातील एनएसएस युनिट द्वारे दरवर्षी नेत्रदान विषयक पथनाट्य व चित्रद्वारे समाजप्रबोधन केले जाते.यासाठी एनएसएस प्रमुख प्राध्यापक राजकुमार पटले व कल्पना घोषाल यांचा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तसेच नेत्रदान सहाय्यक म्हणून सेवा देणाऱ्या रिता विजय अरोरा यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांचे काम समाजात एक सकारात्मक बदल घडवणारे ठरले आहे.
या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नेत्रदान या विषयावर सुंदर चित्रे रेखाटून जनजागृतीचे एक वेगळे माध्यम सादर केले.त्यांच्या कलाकृतींना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मांचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आयोजकांनी त्यांचं कौतुक करत सांगितलं की, “या चित्रकलेतून जेव्हा सामाजिक भान उमटतं, तेव्हा ती केवळ कला न राहता परिवर्तनाचं साधन बनते.”
या संपूर्ण कार्यक्रमात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल,नेत्र शल्य चिकित्सक डॉ.चंद्रकिशोर पारधी, नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले नागपुरे यांनी विशेष योगदान दिले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात “नेत्रदान ही काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने यासाठी पुढाकार घेतल्यास, अनेकांना नवदृष्टी व नवजीवन मिळू शकतं.समाजात आपली भूमिका सकारात्मक असावी, हीच खरी सेवा आहे.”
