सामाजिक

पारदर्शक व सकारात्मक दृष्टिकोनातून पत्रकारांनी लिखाण करावे – तहसीलदार आनंद जाधव

 

सडक अर्जुनी.:-  आजच्या काळात पत्रकारिता ही बदलत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी आणि आताच्या पत्रकारितेमध्ये काळानुसार जरी तफावत दिसून येत असली तरी लोकशाहीमध्ये माध्यम हा एक महत्त्वाचा स्तंभ आहे. त्यामुळे माध्यमावर आजही लोकांचा विश्वास आहे. त्यासाठी पत्रकारांनी बातमी लिखाणाचे काम करताना सत्य असत्य जाणून घेऊन पारदर्शक व सकारात्मक दृष्टिकोनातून लिखाण केले पाहिजे . असे प्रतिपादन सडक अर्जुनी चे तहसीलदार आनंद जाधव यांनी व्यक्त केले.

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका सडक अर्जुनी च्या वतीने अशोक लंजे ज्युनिअर कॉलेज सडक अर्जुनी येथे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार संघाचे मार्गदर्शक प्रा.डॉ.राजकुमार भगत हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे, गटविकास अधिकारी आदित्य ठाकरे पं स. सडक अर्जुनी, वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे सडक अर्जुनी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रणित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बस्तवाडे, महामार्ग केंद्र डुग्गीपार, अशोक लंजे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर. वाय. कापगते, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी दामाजी पाटील लंजे माध्यमिक आश्रम शाळा सडक अर्जुनी येथील इयत्ता १० वी मधून शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणारी कु . चांदणी पुरुषोत्तम शेंडे या विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाची पुस्तक देऊन तसेच एकल महिलांचे पाल्य यांचा देखील महापुरुषांचे पुस्तक व पेन देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक सेवानिवृत्त प्राचार्य अनिल मेश्राम, संचालन पत्रकार संघाचे सचिव बिरला गणवीर, तर आभार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शाहीद पटेल यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे सहसचिव प्रभाकर भंडारकर, कोषाध्यक्ष वामन लांजेवार तसेच तसेच इतर सदस्य व शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केले.