General

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे “घर घर संविधान” मेळाव्याचे आयोजन

गोंदिया :-  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने “घर घर संविधान मेळावा” तसेच भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्षानिमित्त समतेचा वैचारिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम (दि. 21 मार्च) रोजी सायंकाळी 6.00 वाजता भीमनगर ग्राउंड, गोंदिया येथे संपन्न होणार आहे.

 

या महोत्सवात “संविधान जलसा – शिवराय ते भिमराय” या संकल्पनेवर आधारित विशेष सांस्कृतिक सादरीकरण सादर करण्यात येणार असून जाधव सिस्टर्स यांचा “दुनिया में भीमजी महान” हा प्रेरणादायी संगीत कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरणार आहे.

 

भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्षानिमित्त समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार व्हावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील माननीय शासकीय प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

महामानवांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.