General

किंडगीपार येथे दारू दुकान बंदीसाठी महिलांचा आक्रोश मोर्चा

आमगाव/ गोंदिया :- दि. २० मार्च  व्यसनाधीन असलेल्या पुरुषांच्या जाचाला कंटाळून ग्राम कीडांगीपार येथे दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी आज महिलांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

आज सकाळी 8 वाजल्यापासून पाणी टाकी परिसर, बाल उद्यान, हनुमान मंदिर परिसर तसेच अंगणवाडी प्रांगण येथे महिलांची व ग्रामस्थांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

कीडांगीपार गावाची लोकसंख्या अंदाजे अडीच हजार असून, बहुतांश नागरिक मजूर, हमाल तसेच शेती व्यवसायाशी संबंधित आहेत. आमगावपासून काही किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव पक्के रस्ते, नाल्या, अंगणवाडी, नगरपरिषद प्राथमिक शाळा तसेच गोशाळा अशा मूलभूत सुविधांनी सुसज्ज आहे. स्वच्छता व देखभालीसाठी हे गाव विशेष ओळखले जाते.

गावाच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक वातावरण निरोगी ठेवण्यासाठी गावात दारू दुकान नसावे, असा ठाम निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे. जागरूक महिला, युवक आणि ग्रामस्थांनी उचललेले हे पाऊल समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

दरम्यान, मोर्चाची पूर्वसूचना मिळाल्याने स्थानिक प्रशासन व पोलिस यंत्रणा सकाळपासून मोठ्या संख्येने तैनात होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरात पोलिसांच्या वाहनांचीही मोठी उपस्थिती दिसून आली.

ग्रामस्थांच्या मते, हा मोर्चा गावातील भावी पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी काढण्यात आला आहे.