वेतनाअभावी हातपंप देखभाल दुरुस्ती कामगार संपावर
गोरेगाव :- वर्षातील तीनही ऋतूत जनसामान्याची तहान भागविण्याकरिता काबाड कष्टाने हातपंप दुरुस्ती करून जल व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक म्हणून काम करणाऱ्या हातपंप देखभाल दुरुस्ती कामगारांवर स्थानिक प्रशासन कोपले आहे असे म्हणावे लागेल. याला कारण असे की, (दि.11मे) पासून पंचायत समिती गोरेगाव येथील प्रांगणात जिल्ह्यातील 63 हातपंप देखभाल दुरुस्ती कामगार त्यांना मिळणाऱ्या वेतनाअभावी संपावर गेलेले आहे. एकतर अपुऱ्या वेतनामुळे परिवाराचे ओझे वाहने मुश्किल झाले आहे त्यातच वेतनातील अनियमिततेमुळे हे ओझे अधिकच जड झाले आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील उदरनिर्वाह कसा करावा असा सवाल संपकरी परिवाराकडून प्रशासनाला केला जात आहे. संपावर जाण्यापूर्वी या कामगारांनी त्यांच्या समस्ये विषयी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्याशी चर्चा केली मात्र त्यातही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने भर उन्हात पंचायत समितीच्या प्रांगणात संपावर बसले. याविषयी गोरेगाव पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांनी सांगितले की, प्रती हातपंप अडीच हजार रुपये प्रमाणे वसुली ग्रामपंचायत कडून जमा करण्यात आली नाही त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबल्याचे त्यांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे आदेश निर्गमित केलेले आहे मात्र संबंधित विभागाने त्यावर अजूनही कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे आज हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या परिवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे यांनी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांची विचारपूस करून पाठिंबा दिला व प्रशासनाने त्यांच्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या असे सांगितले. यापुढे प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.