General

रात्री आठ नंतर टिकीट नाही!


गोंदिया:- शहरातील रेल टोली परिसरातील रेल्वेचे तिकीट घरात रात्री आठ नंतर तिकीट मिळत नसल्याने सामान्य प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आजघडीला रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलेल्या स्थितीत असल्याने रेल्वे गाड्या अपेक्षित फलाटावर येतील की नाही याची शाश्वती नाही. मालगाड्यांना अधिक प्राथमिकता मिळत असल्याने सामान्य प्रवाशांच्या सेवा सुविधांचे देणे घेणे रेल्वे प्रशासनाला राहिले नाही असेच दिसून येते.तेच आता रात्री आठ नंतर काउंटर वर टिकीट मिळणे बंद झाल्याने तिकिटासाठी शेकडो पायऱ्या चढून मुख्य काउंटरकडे धाव घेताना प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहेत. यावेळी लग्न समारंभाचे कार्यक्रम जिकडेतिकडे असल्यामुळे हजारो प्रवासी आवागमनासाठी रेल्वेने प्रवास करत असतात. त्यात लहान मुलापासून महिला अबाल वृद्धांचा समावेश असतो. एकीकडे 45 डिग्री तापमान व दुसरीकडे प्रवासादरम्यान पाण्याची तहान भागवण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागतो असे असताना देखील गोंदिया बालाघाट मार्गाकडील येणाऱ्या प्रवाशांसाठी या तिकीट घराचे सुरळीत संचालन अपेक्षित होते मात्र तसे होत नसल्यामुळे हजारो प्रवाशांच्या मनात रेल्वे प्रशासना विषयी संभ्रम निर्माण होत आहे. रेल्वेच्या खाजगीकरणाचे चटके लखलखत्या उन्हापेक्षा जास्त असल्याचा गंभीर असल्याचा अनुभव सामान्य प्रवासी घेत आहेत.