Generalगुन्हेगारी बातमीविदर्भ

विजयच्या मृत्यूचे जबाबदार कोण? सर्व टोल फ्री नंबर सुट्टीवर होते की काय? शासकीय यंत्रणांची पीछेहाट झाल्याचे विदारक चित्र या घटनेत पुढे आले, त्यानिमित्ताने…

गोंदिया:- शहराच्या लगतच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील कटंगी येथील थाटबाट रेस्टॉरंट च्या समोर (दि. 29 मे) रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ट्रक क्रमांक cj 04/jb4613 ने मागून धडक दिल्याने मोहऱ्यान टोला नागरा येथील रहिवाशी मृतक विजय सदाशिव हुमे (45)ची प्राणज्योत मालवली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवनवेल चालवणारा विजय नेहमीप्रमाणे रोजंदारीचे काम करून घरी परतत असताना एका ट्रक चालकाने जोरदार धडक दिल्याने तीन मुलींच्या आयुष्यातून पित्याचे छत्र हरपले, पत्नीवर अचानकच विधवा होण्याचे संकट ओढावले व त्याच्या म्हाताऱ्या आई-वडिलांसाठी ती काळारात्र ठरली.
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी एका लग्नाची वरात ही थाटबाट रेस्टॉरंट कडून जीनियस रिसॉर्टकडे पायी जाण्यास निघाली होती. वरात असल्यामुळे सहाजिकच शेकडो वराती व डीजेच्या धुमधडाक्यात नाचत होते. जोराचा डीजे वाजत असल्यामुळे की काय या अपघाताचे आवाज रामनगर पोलिसांपर्यंत पोहोचले नसावे, त्यामुळे ते घटनास्थळी दोन ते अडीच तास उशिरा पोहोचले. कोणतीही ॲम्बुलन्स सुद्धा उपस्थित होऊ शकली नाही असे उपस्थितांचे म्हणणे आहे. जसे काही सर्व टोल फ्री नंबर सुट्टीवर होते की काय..
तोपर्यंत परतीकडे जाणाऱ्या शेकडो कामगारांचा लोट तिकडे वळला होता. तेव्हा महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. शेकडो वाहने दोन्ही बाजूला जमले होते त्यामुळे तेथील वातावरण संतप्त झाले होते. या संतप्त वातावरणात अनेक मोठ्या घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात होती.त्यातच घटनास्थळापासून पाचशे मीटर अंतरावर ट्रॅफिक पोलीस ची पहारेदारी राहते हे विशेष. पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर मृतकास शव विच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे घेऊन गेले.वाहतूक पूर्ववत होऊ लागली.
या घटनेच्या अनुषंगाने अनेक प्रश्न उद्भवतात कामगारांच्या परतीच्या वेळेवर मोठ-मोठे मालवाहू ट्रक यांना वाहतूकीची परवानगी कोण देतो? महामार्गावरून नाचत जाणाऱ्यांनी डीजे करून नाचण्याची परवानगी घेतली होती का? इतक्या वर्षापासून व्यवसायिक मंगल कार्यालय /रिसॉर्ट मालकांनी पर्यायी रस्ता बनवला का नाही? जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अनेक बाबतीत आपलीच पाठ थोपाटताना दिसते मात्र यावेळी त्यांचा प्रतिसाद वेळ काय होता असा सवाल सामान्य जनता विचारत आहे.
यावेळी पुन्हा एकदा नवीन घटना घडताना रामनगर पोलिसांनी दाखल केलेल्या(अ. क्र.146/2023) गुन्ह्यात संबंधित ट्रकच्या काचा फोडल्याचा व पाच हजार रुपयांचा नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे व त्यात आरोपी म्हणून मृतकाच्या शेजार्यांचेच नावे टाकली आहेत या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांशी विचारपूस केली असता त्यांनी आरोपीचे नावे देण्यास टाळाटाळ केली. घटनास्थळी त्या ठिकाणी शेकडो लोकांची गर्दी जमलेली होती. परिवारातील आप्तेष्टाचे रडणे सुरूच होते. मृतकाच्या वतीने सहानुभूती दाखवून त्यास मदत करणाऱ्या सात शेजाऱ्यांचेच नावे का असा सवाल संबंधितांच्या मनात घर करत आहे. या घटनेस जिम्मेदार असणाऱ्या रिसॉर्ट मालकावर गुन्हा दाखल का नाही, लग्नाच्या अनुषंगाने वरात घेऊन जाणाऱ्यावर गुन्हा दाखल का नाही घटनास्थळापासून जवळच हायवेवर दारूभट्टी सुद्धा संचालित होते हे सगळे कुणामुळे यासारखे अनेक प्रश्न उद्भवतात. यावेळी उपस्थित जनतेच्या मनात पोलिसा विरोधात आक्रोश पाहण्यालायक होता!अशावेळी गृह विभागातील पोलीस दलाच्या प्रतिमेचा प्रश्न जिव्हारी लागतो. जर या घटनेत मृतक बड्या राजकीय घराण्यातील किंवा मोठ्या शासकीय वर्गातील अधिकारी असले असते तर या घटनेचे चित्र काय असते. पोलीस विभागात सेवा देणारे हजारो कर्मचारी हे अशाच हलाखीच्या जीवन जगणाऱ्या कुटुंबातून आलेले असतात सेवा देताना अशा घटनांचे साक्षीदार बनताना पोलीस दलातील मूठभर कर्तव्यहीन, बेजबाबदार व्यक्तींमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा डागाळली जात असल्याचे दुःख आपल्या मनात पचवत आहेत.जर या यंत्रणांनी आपल्या कर्तव्यातील तत्परता दाखवली असती तर कदाचित मृतकाचे प्राण वाचले असते. यानिमित्ताने शेवटी पोलिसांनी आपली सहानुभूती कोणा प्रती दाखवायची हे ठरवण्याची वेळ आलेली आहे असे वाटते.