शासकीय धान्य गोदामातूनअवैधरित्या अन्नधान्याची उचल
गोंदिया:- राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2013 नुसार सामान्य नागरिकांना शासनातर्फे गहू, तांदूळ, मका आदी विविध प्रकारचे अन्नधान्य शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येतो.या अन्नधान्याच्या साठवणुकीसाठी शासनाने निश्चित केलेल्या गोदामातून स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. या पुरवठ्या दरम्यान जिल्ह्यातील रावणवाडी येथील गोदामातून शासकीय वेळेपूर्वीच सकाळी सहा वाजल्यापासून तर मध्यरात्रीपर्यंत धान्य साठ्याची उचल करून अवैधरित्या इतर ठिकाणी वळते करत असल्याची बातमी पुढे आली आहे. या वेळेत गोदाम व्यवस्थापक उपस्थित राहत नसताना या मालवाहू वाहनांच्या माध्यमातून बाहेर जाणारा धान्यसाठा नक्की जातो कुठे याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या गोदामातून ग्रामीण भागातील अनेक स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार अनेकदा या भागातील नागरिकांकडून केली जात आहे. या गोदामातून शेकडो स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. तेथील हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याच्या या घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या गोदामातून मालवाहतूक करणारे ट्रक मालक-चालक गोदामाच्या नजीकच त्यांच्या रहिवास असल्याने रात्री उशिरापर्यंत गाड्या लोड करून दुसऱ्या पहाटेच त्या धान्यसाठ्याची विल्हेवाट लावली जाते. अशी चर्चा आहे.विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ट्रक मालकाचे इतर व्यापाऱ्यांशी साटेलोटे असून त्यात गोदाम व्यवस्थापकाचे सुद्धा कट राहत असल्याचे बोलले जात आहे. याकडे पुरवठा निरीक्षक व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याचे सरसकट उल्लंघन होत असल्याची बाब अतिशय निंदनीय आहे.