जिल्ह्यात 112 ला प्रतिसाद नाही! पोलीस पाटीलाने उचलला महिलेवर हात!
गोंदिया:- सामाजिक घटकात होणाऱ्या गुन्हेगारीच्या प्रकरणांना आळा घालण्याच्या दृष्टीने शासनाने अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी करतांना प्रशासनाचे प्रयत्न कमी पडत असल्याची बाब पुढे आली आहे. घटना गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या तेढवा येथील (दि.10)रोजी दुपारी 3.30 दरम्यान गावातीलच पोलीस पाटील कमलेश मूलचंद तुरकर राहणार तेढवा त्याचा परिवार व फिर्यादी महिला यांच्यात शेतात चरत असलेल्या शेळ्यांना शेतातून सोडून आणले पण त्यांचा दोर परत दिला नाही. ते मागण्यासाठी फिर्यादी त्याच्या घरी गेली असता आरोपीचा भाऊ, वडील यांनी संगनमताने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करून कमरेच्या खालच्या भागातील गलिच्छ शब्दाने तिचा अपमान केला. तसेच डोक्यावरील भागाला मारहाण करून कानाच्या खालच्या बाजूला गंभीर दुखापत झाली असल्याची दखल मेडिकल रिपोर्ट मध्ये आहे. विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर महिला ही आपल्या मुलांसह एकटीच गावात राहून मोलमजुरी करते व तिचा पती आपल्या उदरनिर्वाहाची गरज भागविण्याकरिता हैदराबाद येथे कामाला आहे. या घटने दरम्यान आपल्या मदतीसाठी धावणार कोण? असा प्रश्न पडताच तिला 112 क्रमांकाची आठवण झाली. त्यावर तिने कॉल केला पण त्या कालवर तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशन रावणवाडी येथे पोहोचून आपली फिर्याद नोंदवली. त्यावर पोलिसांनी अप क्र.426/23 अदखलपात्र गुन्हा नोंदवून भादवी 323,504,506 कलमांन्वये पुढील तपास पोहवा आनंद बावनथडे करत आहे.
आपातकालीन व्यवस्थेमध्ये एखाद्या पीडित व्यक्तीने विशेषतः महिलेने मदत मागितल्यास शासनाच्या गृह विभागातील पोलीस यंत्रणा ही सेवा पुरवण्यास अयशस्वी ठरल्याचे ज्वलंत उदाहरण यानिमित्ताने पहावयास मिळत आहे. या टोल फ्री नंबर वर कॉल आल्यास त्याची तात्काळ दखल घेणे अत्यावश्यक आहे व प्रतिसाद न दिल्यास सदर कर्मचाऱ्यावर निलंबनाची तरतूद देखील आहे असे असले तरी कारवाई करणार कोण?
महिलांना अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करणे हे तर खूप मोठी बाब झाली त्यांच्याकडे वाईट नजरेने बघितले तरी गुन्हा दाखल होतो. दुर्दैवाने या बाबीचा प्रचार प्रसार सामान्य जनमानसामध्ये नाही म्हणून या यंत्रणेचा भाग म्हणून पोलीस पाटील जरी असला तरी त्याला सुद्धा या बाबीचा भान राहिला नाही व त्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्या पोलीस पाटलावर कारवाई होणार का?असा संतप्त सवाल गावकरी जनतेच्या मनात घर करत आहे. समाजात अनेक अनिष्ट घटना घडत असतात त्यामधून किती घटना पोलीस पाटलांच्या साह्याने पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचतात हा चर्चेचा भाग आहे. ज्याला गावातील जनतेच्या रक्षणासाठी शासनाने नेमून दिले आहे तोच जर जनतेच्या विरोधात गेला तर जनतेच्या सेवेसाठी घेणाऱ्या शपथेचे काय?
एकीकडे पोलीस यंत्रणा 112 क्रमांकावर आलेल्या फोन कॉल वर दिलेल्या प्रतिसादाचे मार्केटिंग करतात पण या प्रकरणात ती सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने जनतेच्या मनात हळहळ व्यक्त होत आहे.