खड्ड्यांच्या विरोधात सभापती उतरणार रस्त्यावर
गोंदिया :- गोंदिया तिरोडा महामार्गावर टी पॉइंट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कुडवा पर्यंत रस्त्यावर पाण्याच्या विसर्गाचा कोणताही स्थायी मार्ग आजपर्यंत बांधकाम विभागाकडून करण्यात आला नाही, त्यामुळे या महामार्गावर मोठ मोठ्या खड्ड्यांची समस्या ही नेहमीची बाब झाली आहे. या चौकातून गोंदिया ते दासगाव, गोंदिया ते धापेवाडा येथील हजारो नागरिक प्रतिदिन आवागमन करत असतात. या परिसरात अनेक नागरिक महिला अबाल वृद्ध व विद्यार्थ्याना गंभीर दुखापत होऊन शारीरिक दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. जनतेच्या या समस्येकडे लक्ष न देणाऱ्या बांधकाम विभागाच्या विरोधात स्थानिक जिल्हा परिषद सदस्य व समाज कल्याण सभापती पूजा अखिलेश शेठ यांच्यासोबत ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने (दि. 11 सप्टेंबर) रोजी हरीणखेडे पेट्रोल पंप जवळ धरणे आंदोलन करणार आहेत. सदर समस्या 24 तासात परिपूर्ण करा अशी त्यांची मागणी आहे. याविषयी गावातील सरपंच बाळकृष्ण पटले, उपसरपंच व इतर सदस्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन खड्डे दुरुस्तीची मागणी केली त्यावर प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे अखेर स्थानिक जनप्रतिनिधींनी चक्काजाम आंदोलनाचा मार्ग स्वीकारला व यावेळी कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे सांगितले.