तंत्रज्ञानदेश-विदेश

पोस्ट ऑफिसच्या सेवा होणार अधिक वेगवान


गोंदिया :- एकेकाळी पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र, मनीऑर्डर यांची वाट पाहण्याचे अनुभव अनेकांना असतील, थेट राजेश खन्नाच्या चित्रपटातील गाण्याच्या त्या ओळी ‘ डाकिया डाक लाया’ या बाबी अनेकांच्या जीवनातील अनुभवाचा भाग झाले आहेत. आधुनिकीकरणाच्या युगात डाक विभाग डिजिटल झाले आहे. त्यामुळे आता ग्रामीण व शहरी भागातील मध्यमवर्गीयाच्या आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या पोस्ट ऑफिस ची सेवा अधिक वेगवान होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना आता पोस्ट ऑफिस मध्ये मिळणाऱ्या सुविधांसाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. त्यातील सविस्तर असे की, मुख्य पोस्ट ऑफिस गोंदिया येथे(दि.1 ऑक्टो.) रोजी जिल्ह्यातील आठही तालुक्यातील पोस्टमास्तरांची गर्दी जमली होती. त्यात त्यांना 5जी अँड्रॉइड मोबाईल संच वाटप करण्यात आले. या मोबाईल्समुळे आता ग्रामीण भागातील ग्राहकांना पोस्टाची बचत योजना, जन सुरक्षा योजना, ग्रामीण टपाल जीवन विमा योजना, तसेच आधार इनेबल पेइंग सिस्टम द्वारे आधार नंबर च्या वापराने रोख रकमेसाठी आता शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही. यामध्ये पी एम किसान योजनेचीही विस्तृत माहिती वेळोवेळी मिळवता येऊ शकेल. यासोबतच अनेक शासकीय योजनांच्या लाभ घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांना विविध सवलती वेळच्यावेळी मिळतील. एक ऑक्टोबर 1854 ला दिल्ली येथे प्रथम पोस्ट ऑफिस ची सुरुवात झाली होती. तसेच एक ते सात ऑक्टोबर पर्यंत टपाल सप्ताह निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन विभाग व जिल्हा स्तरावर केले जाते.167 वर्षापासून आजपर्यंत जनसामान्यांना सतत सेवा देत असताना आता या विभागाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील करोडो नागरिकांना तात्काळ सेवा पुरविण्यासाठी टपाल विभाग सज्ज आहे.