इंग्रजांच्या काळातील शाळेला अजूनही इमारत नाही!
गोंदिया / प्रतिनिधी :- इंग्रजांच्या काळात जिल्ह्यातील काही मोजक्या ठिकाणीच शाळांची निर्मिती करण्यात आली होती. त्यातीलच जिल्ह्यातील रावणवाडी येथील शाळेची निर्मिती सन 1913 ला झाली होती. त्या शाळेत परिसरातील अनेक पिढ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून नोकरी, व्यवसाय, राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य दाखविले. मात्र आज त्या शाळेच्या इमारतीची दयनीय अवस्था चर्चेचा विषय बनली आहे. आजही त्या शाळेत गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गावातील शेतकरी कामगारांची मुले त्यांच्या आयुष्यातील प्रगतीच्या संधी शोधत असतात. त्यामुळे या शाळांचे महत्त्व काय हे प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने त्याचे मूल्यांकन करू शकतो. आजघडीला एकीकडे शिक्षकांचा अभाव, दुसरीकडे इमारतीची कमतरता, त्यातच शासन देशात गांधी जयंती निमित्त स्वच्छता सप्ताह राबवत असतांना शाळेतील मुलींसाठी स्वच्छतागृहांचा सुद्धा अभाव अशा परिस्थितीत तेथील विद्यार्थ्यांना आपलं शैक्षणिक परिपाठ पूर्ण करावा लागतो, याला “अच्छे दिन” म्हणता येईल काय असा सवाल तेथील पालकांच्या मनात घर करत आहे. केंद्र शासन आपल्या स्तरावर “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अशा विविध कल्याणकारी योजनांची निर्मिती करते मात्र त्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनावर शंका निर्माण होत आहे. ही एक केंद्रशाळा असून नवीन इमारतीसाठी शाळेच्या व्यवस्थापन समितीने अनेकदा पत्रव्यवहार करून मागणी केली मात्र प्रशासनाने या समस्येची अद्याप दखल घेतली नाही. आजही तेथील विद्यार्थ्यांना टपकत्या छताखाली शिक्षण घ्यावे लागत आहे.तेथील स्थानिक ग्रामपंचायतीकडे स्वच्छतागृहासाठी गेले अनेक महिन्यांपासून निधी पडून आहे मात्र श्रेय घेण्याच्या राजकारणावरून अजूनही तेथील शेतकऱ्यांच्या लेकींना हक्काचे स्वच्छतागृह मिळालेले नाही. मागील सहा महिन्यांपासून पंचायत विभागात पदोन्नती घेऊन ग्राम विकास अधिकाऱ्याचे रूपाने तेथील स्थानिक प्रशासनाला अधिकारी लाभले आहेत मात्र त्याच्याही लक्षात ही बाब आली नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.यापुढे येणाऱ्या काळात गावाचा विकास होईल की भकास हे वेळच ठरवेल.