एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे कामकाज रखडले
देवरी प्रतिनिधी :- जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी केंद्र व राज्य सरकार द्वारे अनेक योजनांची निर्मिती केली जाते व त्या योजनेच्या अमलबजावणीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सारखे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी विविध योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना त्यांच्या सोयी सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य करते. मात्र मागील तीन महिन्यापासून कार्यालयाचे कामकाज रखडले आहे. त्याला कारण असे की, कार्यालयात तीन सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांची बदली झाल्यापासून त्यांची पदे रिक्त आहेत.सोबतच वित्त अधिकारी यांची ही जागा रिक्त आहे विशेष म्हणजे येथील प्रकल्प अधिकाऱ्यांना गडचिरोली जिल्ह्याचे सुद्धा अतिरिक्त प्रभार असल्याने गोंदिया जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कमालीच्या पेचात सापडला आहे. या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शाळा व वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांचे पगार व इतर देयकांचे कार्य लंबित असल्याने कामाचा बोजा अधिकच वाढला आहे. त्यामुळे समाजातील आदिवासी लाभार्थ्यांना विविध योजनेतील लाभ घेण्यासाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. या कार्यालयांतर्गत येणाऱ्या 35 शाळा, एकोणवीस वस्तीगृह व तेथे वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना या अनुपलब्धतेच्या त्रास ओढावण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी याबाबत खंत व्यक्त करून जिल्हाधिकारी व आदिवासी विभाग आयुक्तांनी याबाबत त्वरित पुढाकार घेऊन सदर समस्या मार्गी लावावी असे आवाहन केले आहे.