“जल जीवन मिशनची टाकी” शाळेच्या आवारात
गोंदिया प्रतिनिधी:- जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला हक्काचं स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्याच्या दृष्टीने शासनाकडून जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाण्याच्या टाकी उभारण्यात येत आहेत. या टाक्यांची निर्मिती गावातीलच योग्य स्थळ पाहून ग्रामपंचायतीच्या संगनमताने केली जाते. मात्र गोंदिया तालुक्यातील ग्राम बरबसपुरा येथे ही पाण्याची टाकी चक्क जिल्हा परिषद शाळेच्या आवारात उभारण्यात येत आहे. त्या ठिकाणी टाकीचे खोदकामही करण्यात आलेले आहे. याबाबत शिक्षण समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांना कोणतीही सूचना न देता त्यांच्या गैरहजेरीतच खोदकाम करण्यात आले. यात झाले असे की जिथे खोदकाम आहे त्याच्या लगतच चिमुकल्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरतात या दरम्यान तिथे कुठलेही बचाव तंत्र उपलब्ध नव्हते हे विशेष. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना बांधकामाचे दृश्य पाहण्याची उत्सुकता टोकावर होती. या बांधकामासाठी शालेय शिक्षण समितीचे कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. त्या समितीचे म्हणणे गरजेचे वाटले नाही. अशावेळी एखादी दुर्घटनात्मक घटना घडल्यास नाहक शाळेतील शिक्षकांना वेठीस धरल्या जाते मात्र, पाणी टाकीच्या सर्वे करणाऱ्या यंत्रणांना कोणते निर्देश देण्यात आले होते यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे गावात जुनी पाणी टाकी आहे त्यालगत मुबलक प्रमाणात जागा सुद्धा उपलब्ध आहे तरीही, पाणी टाकी शाळेच्या आवारात कशी काय उभारली जात आहे असा प्रश्न ग्रामीण नागरिकांना भेडसावत आहे. जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच एका नवनिर्मित पाणी टाकीचे काय हाल झाले याची जाणीव सगळ्यांनाच आहे मात्र, दुसऱ्या उदाहरणात बरबसपुराची टाकी सुद्धा निमंत्रण देत तर नाही! याबाबत न बोललेलेच बरे. प्रशासन याविषयी काय कृती करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.