रस्त्यावरील मिनी ब्रेकर मुळे प्रवाशांचे जीव धोक्यात!
गोंदिया प्रतिनिधी:- शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे प्रवाशांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होत असलेले अनेक ठिकाण आहेत. त्यातच आरटीओ ऑफिस पासून शहराकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर एक मिनी ब्रेकर बसवण्यात आला आहे. त्यामागचं नेमकं कारण काय हे अद्याप कळू शकले नाही. त्याला कोणतीही मार्किंग नसल्याने व तो रस्त्याच्या मधोमध असल्याने प्रवास करताना सहजासहजी लक्षात येत नाही पण त्याच्या झटका मात्र नकळतच बसतो. त्यामुळे त्यावरून प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकी चालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे . विशेषतः दुचाकी वर मागे बसलेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्याचा जास्त त्रास होत आहे. अनेकदा या ब्रेकर वरून प्रवास करत असताना दुचाकी स्वारांचा अपघात होऊन ते किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्या रस्त्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे मात्र या मिनी ब्रेकरला खुली छुट देण्यात आली आहे की काय असा सवाल प्रवासांच्या मनात जोर धरत आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन यावर उचित तोडगा काढून प्रवासांचे संरक्षण करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.