General

रेल्वे प्रवाशांना तिकिटाची अडचण!

गोंदिया प्रतिनिधी:- रोजच्या धावपळीच्या जीवनात रेल्वे ट्रेन चे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रतिदिन करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. पण रेल्वे तिकिटाशिवाय प्रवास करणे शक्य नाही. तर तिकीट घेण्यासाठी रेल्वेचे तिकीट घर उघडे राहत नाही. ही परिस्थिती गोंदिया रेल्वे जंक्शन च्या रेलटोली परिसरातील आहे. हे जंक्शन मुंबई कोलकत्ता महामार्गांवर असल्याने व लगतच मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने त्याला अधिकच महत्त्व आहे. असे असून हे स्टेशन शहराच्या मध्यभागातून जात असल्यामुळे दोन भागात शहराची विभागणी झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश करून येणारे प्रवासी व जिल्ह्यातील इतर ठिकाणातील येणाऱ्या प्रवास्यांना ऐनवेळी तिकिटाची सुविधा मिळत नाही, तसेच मुख्य तिकीट घराकडे जाण्यासाठी उंच पुलावरून जाण्याचा मार्ग सहज सोपा नाही या भानगडीत अनेक प्रवासांच्या गाड्या सुटतात व प्रवाशांच्या हाती मात्र निराशाच लागते. या समस्येच्या निराकरणासाठी सामान्य नागरिकांनी अनेकदा रेल्वे प्रशासनाला व रेल्वे कमिटीच्या सदस्यांना निवेदनाद्वारे विनंती केली मात्र आजपर्यंत त्या समस्येवर तोडगा निघाला नाही. या समस्येबद्दल विचारणा करण्यासाठी मुख्य प्रबंधकांना भेटण्यास गेले असता ते भेटले ही नाही व भ्रमणध्वनीवर प्रतिसादही दिला नाही.सण उत्सवाच्या काळात हजारोच्या संख्येने प्रवासी मोठ्या शहरांकडून आपल्या घराकडे परततात त्यात महिला, छोटे बालक,अबाल वृद्ध यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो.अशावेळी तेथील सामान्य नागरिकांना हक्काच्या सोयी सुविधा पुरवल्या जात नसतील तर रेल्वे प्रशासन व रेल्वे कमिटीचे मुख्य कर्तव्य तरी काय असा प्रश्न सामान्य प्रवासाच्या मनात घर करत आहे. रेल्वे प्रशासन या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन त्यावर काही मार्ग काढणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.