General

कचरा गाड्यांचे व्यवस्थापन झाले कूचकामी

गोंदिया प्रतिनिधी :- पर्यावरणाचे प्रदूषण थांबवून त्याचे रक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी शासनाद्वारे स्वच्छ भारत मिशन अशा अनेक योजना राबवून स्थानिक पातळीवर घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे आदेशित केले आहे. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाद्वारे मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध केला जातो. मात्र त्या निधीचा योग्य उपयोग न करता कूचकामी कचरा गाडे बनवण्यात आल्याने स्थानिक प्रतिनिधी जनतेच्या डोळ्यात धुळ फेक करत असल्याची बाब पुढे आली आहे. सदर बाब गोंदिया तालुक्यातील ग्राम टेमणी येथील असून गावात होत असलेल्या बोगस कामकाजांच्या विरुद्ध तेथील नागरिकांच्या मनात रोष व्यक्त होत आहे. याविषयी अधिक माहिती करिता ग्रामसेवक यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी यादीमध्ये चुकीचा नंबर दिला आहे त्यामुळे संपर्क होणे दुरापास्त झाले. ग्रामपातळीवर सेवा सुविधांसाठी आलेला निधी हा स्थानिक लोकांच्या टॅक्स मधून जमा झालेल्या पैशाच्या द्वारे ग्रामविकासासाठी येत असतो, मात्र तेथील स्थानिक प्रतिनिधी त्या पैशाचा दुरुपयोग करून ग्रामविकासापेक्षा स्वतःच्या विकास साधण्याकडे जास्त अग्रेसर आहेत असे दिसून येत आहे. संबंधित कामाचे बिल पास करणारे जेई व त्यावर देखरेख करणारे विस्तार अधिकारी हे आपल्या अहवालात काय शेरा देतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. बरेचदा अधिकारी व कंत्राटदार यांच्यामध्ये ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी भूमिका निभवत असल्याने ग्रामीण भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या हक्क, अधिकारांशी खेळ होत असल्यामुळे तेथील नागरिकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. फक्त भौतिक सुख सुविधांचे आधारे होत असलेल्या कार्याला विकास म्हणता येईल का? जर असे असेल तर होत असलेल्या सदर प्रकाराला काय म्हणावे.याच गावातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे तेथील ग्रामसेवक आजही निलंबित आहे,मात्र स्थानिक प्रशासनाने अजून त्याची दक्षता घेतली नसल्याचे चित्र पुढे आले आहे.