महाराष्ट्

राज्यातील आरोग्य सेवा सलाईनवर, एन आर एच एम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने आरोग्य सेवेची गती मंदावली

गोंदिया :- सध्या राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने राज्यातील आरोग्य सेवेची गति मंदावली आहे. कायम सेवेत समायोजन करावे या मुख्य मागणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेले सुमारे 30,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 25 ऑक्टोबर पासून विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात पुकारलेल्या आंदोलनात राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भेट दिली असून विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व कर्मचाऱ्यांना (दि.7 नोव्हें) रोजी कॅबिनेट मध्ये चर्चा करून दिवाळीनिमित्त गोड बातमी देऊ अशी माध्यमांसमोर जाहीर घोषणा केली मात्र,आज घडीला 25 दिवस लोटून सुद्धा त्या घोषणाची पूर्तता करण्यात आली नाही यावरून आंदोलन कर्त्या कर्मचाऱ्यांच्या मनात राज्य सरकार विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार पदभरती करत नसल्याने पूर्वीच कर्मचाऱ्यांची कमतरता होती मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने त्याची तीव्रता अधिक वाढली आहे. राज्यात विशेषतः ग्रामीण भागात आरोग्य सेवा सलाईनवर असल्याचे चित्र दिसत आहे. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भव योजनेत आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी डॉक्टरांना अभावी परिचारिका व एम पी डब्ल्यू हे रुग्णांना स्स्टेथासकोप लावून आरोग्य सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांचा दर्जा काय असणार किंबहुना त्यांना अधिकार तरी आहेत का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांच्या अनुपलब्धतेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांची योग्य आकडेवारी मिळत नसल्याने शासनाला त्याचा पुरवठा होत नसल्याची माहिती आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर कर्मचारी व डॉक्टरचा अभाव असल्याने अनेक गर्भवती महिलांची प्रसूती राहत्या घरीच करण्याची सक्ती केली जात असल्याच्या घटना पुढे येत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या गर्भवती महिलांसाठी पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधा फोल ठरत आहेत तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे मनात पुढील भविष्याचे काय याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. यावर शिंदे सरकार काय निर्णय घेते याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत.