गुन्हेगारी बातमी

बेरोजगार तरुणांमध्ये वाढतोय व्यसनाधीनतेचा धोका!

गोंदिया प्रतिनिधी :- जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्येचे ठिकाण असलेले शहरालगतचे फुलचूर हे गाव आहे. यालगतच जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद आदि महत्त्वाची कार्यालय आहेत. ही वस्ती दाट लोकसंख्येची असून जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायत पैकी एक आहे. येथे तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सध्याच्या काळात दारू व इतर अमली पदार्थांच्या सेवनामुळे तेथील सामाजिक स्वास्थ धोक्यात आल्याचे चित्र पुढे येत आहे. हे पदार्थ गावातच सहजासहजी उपलब्ध होत असल्यामुळे तरूण नवयुवक वर्ग सहजासहजी या व्यसनाधीनतेचा बळी होत चाललेला आहे. त्यामुळे सहाजिकच पारिवारिक वातावरणात मानसिक तणाव वाढत असुन त्याचे छोट्या वादातून मोठ्या मोठ्या कौटुंबिक हिंसाचारामध्ये परिवर्तन होताना दिसत आहे. तेव्हा अशा वातावरणात वाढणाऱ्या लहान अबाल बालकांचे बालपण पुढे कोणत्या दिशेला जाऊ शकते याची कल्पना सर्वसाधारण व्यक्ती सहजासहजी करू शकतो. नियमानुसार लोकवस्त्यांच्या ठिकाणी दारू दुकानाला परवाना मिळत नाही तेव्हा अवैध दारू दुकान कसे झपाट्याने वाढत आहेत याविषयीची गंभीर चर्चा गावकऱ्यांच्या मनात घर करत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविषयी रोष व्यक्त करून कायद्याचे अंमलबजावणी करणारे प्रशासन सर्रास त्याचे उल्लंघन करत असल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे. सध्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू असून या काळात सुद्धा सदर परिस्थिती नियंत्रित केल्या जाऊ शकली नाही त्याचे आश्चर्य वाटत आहे. तेव्हा यापुढे या परिस्थितीवर काही तोडगा काढला जाऊ शकेल का? की एखाद्या गंभीर घटनेची वाट पाहिली जाईल याकडे सर्वांच्या नजरा लागलेले आहेत.