विदर्भ

आरंभ फाउंडेशन इंडियाच्या वतीने शिष्यवृत्ती वाटप सोहळा

सडक अर्जुनी :- पळसगाव/ राका येथील आरंभ फाउंडेशन इंडियाच्या वतीने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव/राका येथील इयत्ता पहिली ते सातवीत प्रथम क्रमांक पटविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती वाटपाचा सोहळा 19 जून 2024 ला उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर मल्लेवार होते. पुरस्कार वितरक म्हणून आरंभ फाउंडेशन इंडियाच्या आधारस्तंभ शकुंतलाबाई रंगारी होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरंभ फाउंडेशनचे संस्थापक अमेरिका येथील प्रमानंद रंगारी,नागपूरच्या कुसुमताई कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पुनाराम बनकर, सदस्य घनश्याम बावनकुळे,आरंभ फाउंडेशन इंडियाचे संचालक भोजराज रामटेके, रोशन रामटेके,प्रकल्प समन्वयक आर. व्ही. मेश्राम, मुख्याध्यापक भास्कर नागपुरे, शिक्षिका करुणा वासनिक, पालक देवराम कापगते,विजय वलके, रामदास कापगते, देवराम बावनकुळे, जयश्री मेश्राम आदी उपस्थित होते. सर्व प्रथम मान्यवरांनी सावित्रीबाई फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केले. यावेळी इयत्ता पहिलीतून कु.नित्या रामदास कापगते, दुसरीतून अंशुल सुनील चांदेवार, तिसरीतून कु.दृष्टी नरेंद्र बावनकुळे, चौथीतून कु. राणी विलास मेश्राम, पाचवीतून कु. मानवी नरेंद्र उईके व कु.करीना दीपक मेश्राम, सहावीतून कु. खुशी घनश्याम बावनकुळे आणि इयत्ता सातवीतून कु.वेदांती देवराम बावनकुळे आदी प्रथम क्रमांक पटविणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नवोदय विद्यालयात निवड झालेली विद्यार्थिनी कु.कावेरी विजय वलके आदी नऊ गुणवंत विद्यार्थ्यांना आरंभ फाउंडेशन इंडियाच्या वतीने रोख शिष्यवृत्ती,नोटबुक, पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ‘विद्यार्थ्यांनी मोबाईलचा चांगला वापर करावा व अभ्यासासाठी मेहनत घ्यावी, चांगल्या सवयी लावाव्यात तसेच पालकांनी देखील मुलांकडे लक्ष दयावे’.असे आरंभ फाउंडेशन इंडियाचे संस्थापक प्रमानंद रंगारी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
आरंभ फाउंडेशन इंडियाचे प्रकल्प समन्वय आर. व्ही.मेश्राम यांनी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रस्ताविकेतून दिली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका मंजुश्री लढी
यांनी केले तर आभार मुख्याध्यापक भास्कर नागपूरे यांनी मानले. कार्यक्रमाला काजल कापगते,वर्षा पुस्तोडे, विद्यार्थ्यांचे पालक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

उल्लेखनीय म्हणजे, आरंभ फाउंडेशन इंडियाचे संस्थापक/अध्यक्ष प्रमानंद रंगारी यांनी पळसगाव/राका येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेतले असून ते सध्या अमेरिकेत येथे नोकरीवर आहेत. ते फाउंडेशनच्या वतीने गुणवंत, होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी एक मदत कार्य म्हणून विविध उपक्रम राबवित आहेत.