चला संकल्प करु या, हिवतापाला जनजागृतीने पळवु या….. हिवताप जनजागृती महिना साजरा करण्याचे आवाहन
दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस “जागतिक हिवताप दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा हिवताप विभागाकडुन यावर्षी 1 एप्रिल ते 30 एप्रिल हा संपूर्ण महिना हिवताप जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. जनतेमध्ये हिवतापाविषयी जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनाची अंमलबजावणी करणे व जनतेच्या सक्रिय सहभाग प्राप्त करून घेणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
राज्यात गोंदिया जिल्हा हिवताप संबधाने संवेदनशिल जिल्हा आहे. राज्यातील शेवटच्या टोकावरचा जंगलव्याप्त व तलावांचा जिल्हा म्हणुन प्रसिद्ध आहे. तसेच जिल्ह्याला सिमा मध्यप्रदेश , छत्तीसगड ला लागुन आहे. शेजारी चंद्र्पुर व गडचिरोली जिल्हा आहे. वरिल सर्व भागात हिवतापाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो.शेजारील सर्व भागातुन मजुर व लोकांचे स्थलांतर गोंदिया जिल्ह्यात होत असते. त्या सोबत लोक हिवतापाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आणत असल्याचे अहवाल आकडेवारी सांगत असते. जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक ,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत डास अळी सर्वेक्षण, जलदताप सर्वेक्षण,अॅबेटिंग, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवणे, गप्पी मासे सोडणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना विषयी आरोग्य शिक्षण देणे, गट सभा घेणे इत्यादी कार्यक्रम नियमितपणे राबविण्यात येतात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार भारतामध्ये सन 2030 पर्यॅत हिवताप दुरिकरण करण्याचे ठरविले आहे. यासाठी दि. 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत हि मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटिल,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिष मोहबे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे , जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्या मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीचा विचार न करता हिवतापाचा प्रादुर्भाव हा बाराही महिने जिल्ह्यात असतो तरि सर्व ग्राम पंचायत चे पदाधिकारी, सरपंच,मान्यवर व्यक्तिंनी आपल्या कार्यक्षेत्र गावांमध्ये हिवताप प्रतिबंधात्मक कार्यवाहिला जिल्हा आरोग्य प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकजजी रहांगडाले व उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर यांनी केले आहे. मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, मच्छरदाणीचा वापर करावा, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व निकामी टायर यांची विल्हेवाट लावावी, कुलर ,फ्रिजच्या ड्रीपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे. पाण्याचा हौद ,टाक्या, रांजण इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावे.गटारे वाहत्या करणे, थंडी वाजून ताप येणे, मळमळ होणे, डोके दुखणे, अंगदुखी इत्यादी हिवतापाचे लक्षणे आढळून आल्यास जवळचे आरोग्य संस्थेत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून योग्य तो औषधोपचार करून घ्यावा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी केले आहे