General

बुद्धPEX-२५: गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय टपाल तिकीट प्रदर्शनाचे आयोजन

गोरखपूर | १८ मे २०२५

राजकीय बौद्ध संग्रहालय, गोरखपूर येथे १७ मेपासून सुरू झालेल्या ‘बुद्धPEX-२५’ या आंतरराष्ट्रीय टपाल तिकीट प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या सांस्कृतिक विभाग आणि उत्तर प्रदेश फिलाटेलिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या तीन दिवसीय प्रदर्शनात भगवान बुद्धांच्या जीवनावर आधारित विविध देशांतील टपाल तिकीटांचे सादरीकरण करण्यात आले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन गोरखपूर क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल गौरव श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रख्यात फिलाटेलिस्ट **पद्म रामचेत चौधरी ,आदित्य सिंग तसेच अनेक फिलाटेलिक तज्ज्ञ, अभ्यासक व शाळांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

प्रदर्शनात श्रीलंका, नेपाळ, भूतान, जपान, चीन, थायलंड, अमेरिका, फ्रान्स, व्हिएतनाम आदी १५० हून अधिक देशांतील टपाल तिकिटे, मिनिएचर शीट्स, विशेष कव्हर्स आणि पोस्टकार्ड्सचे सादरीकरण करण्यात आले आहे. या संकलनात बुद्धांचे जन्म, ज्ञानप्राप्ती, धम्मचक्र प्रवर्तन आणि महापरिनिर्वाण या चार प्रमुख घटकांचे टपाल तिकिटांद्वारे दृश्यात्मक दर्शन घडवण्यात आले आहे.

६० हून अधिक फिलाटेलिक फ्रेम्स च्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या या प्रदर्शनात बुद्धांच्या शिकवणी आणि जागतिक प्रभावाचे भव्य चित्रण करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखन, चित्रकला स्पर्धा आणि संग्रहालय फेरी यांचे आयोजन करण्यात आले. सुमारे २५० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

पोस्टमास्टर जनरल गौरव श्रीवास्तव यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले की, “बुद्धPEX-२५ हे प्रदर्शन केवळ एक टपाल तिकिट संकलन नसून, भगवान बुद्धांचा जागतिक प्रभाव दाखवणारे सांस्कृतिक दस्तऐवज आहे.

प्रदर्शनाच्या आयोजनामागील हेतू बुद्ध धर्माच्या प्रचाराबरोबरच भारताच्या बौद्ध वारशाचे जतन आणि जागतिक संवाद साधणे हा होता. हे प्रदर्शन १९ मे २०२५ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

राजकीय बौद्ध संग्रहालय हे १९८७ साली स्थापन झाले असून, यामध्ये बौद्ध मूर्ती, चित्रकला, राहुल सांकृत्यायन यांचे साहित्य, पुरातत्त्वीय वस्तू आणि जैन कलेचा समावेश आहे. हे संग्रहालय गोरखपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे ६ किमी अंतरावर रामगढताल परिसरात स्थित आहे.

बुद्धPEX-२५ हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्ध धर्माच्या प्रभावाची साक्ष देणारे असून, टपाल तिकीटांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारशाची जपणूक आणि जागतिक संवादाची एक प्रेरणादायी पायरी ठरते.