सामाजिक

व्यसनमुक्त समाज हेच आमचे सामूहिक ध्येय – पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल

 

नागपूर: –   शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने, (दि. 17) रोजी नागपूर शहरातील हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत मा. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प व्यसनमुक्ती केंद्र, मोंढा हिंगणा येथे ऑपरेशन थंडर अंतर्गत सविस्तर जनजागृती (अवेअरनेस) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत त्यांना व्यसनमुक्त, सकारात्मक व सन्मानपूर्ण जीवनाकडे प्रेरित करणे हा होता.

 

या कार्यक्रमामध्ये अवेअरनेस लेक्चर, चर्चासत्रे (डिस्कशन) तसेच प्रत्यक्ष अनुभव व उदाहरणांच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. नागपूर शहरात अलीकडच्या काळात करण्यात आलेल्या एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवायांची उदाहरणे देत अमली पदार्थांविरोधात पोलीस प्रशासन प्रभावीपणे कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच ऑपरेशन थंडरमुळे नागपूर शहरात ड्रग तस्करी व ड्रग संबंधित गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सुरक्षिततेवर सकारात्मक परिणाम झाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 

संकल्प व्यसनमुक्ती केंद्रात सध्या एकूण 91 व्यक्ती व्यसनमुक्तीसाठी उपचार घेत असून, त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेत पोलीस प्रशासनाच्या वतीने सातत्याने नैतिक पाठबळ व मार्गदर्शन दिले जात आहे. यावेळी व्यसनांचे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक दुष्परिणाम सविस्तरपणे समजावून सांगण्यात आले.

 

मार्गदर्शन करताना माननीय पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल सरांनी उपस्थितांना प्रेरणादायी उदाहरणे देत सांगितले की, विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींनी व्यसनांवर मात करून जीवनात सर्वोच्च यश प्राप्त केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, जीवन एकदाच मिळते आणि त्याचा योग्य, सकारात्मक व समाजोपयोगी कार्यासाठी सदुपयोग केला पाहिजे.

 

यावेळी त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, व्यसनाधीन व्यक्तींना समाजात सन्मान व मान्यता मिळत नाही. त्यामुळे व्यसनमुक्त होणे हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर सामाजिक प्रतिष्ठा, आत्मसन्मान आणि उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

सदर कार्यक्रमाच्या वेळी परिमंडळ क्रमांक 01 चे पोलीस उपायुक्त श्री ऋषिकेश रेड्डी व सपोआ श्री गुरव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले व व्यसनमुक्तीसाठी पोलीस प्रशासनाच्या कार्याची माहिती दिली.

 

यावेळी माननीय पोलीस आयुक्तांनी उपस्थित रुग्ण व व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक यांना संबोधित करताना “ऑपरेशन थंडरच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भविष्यात रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या ड्रग अ‍ॅडिक्ट व्यक्तींची संख्या कमी झाली पाहिजे, समाजाला व्यसनमुक्त ठेवणे हे आपले सामूहिक ध्येय आहे” असे स्पष्टपणे नमूद केले. पोलीस विभाग हा केवळ कारवाईपुरता मर्यादित नसून, व्यसनग्रस्त व्यक्तींना सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी मदतीच्या भूमिकेत तत्परतेने कार्य करीत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

 

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल सरांनी नमूद केले की, ड्रग अ‍ॅडिक्ट व्यक्तीमुळे केवळ त्या व्यक्तीलाच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांनाही सामाजिक, मानसिक व आर्थिक स्वरूपाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे व्यसनमुक्ती ही वैयक्तिक गरज नसून कुटुंबाच्या सुरक्षित, स्थिर व सन्मानपूर्ण भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

 

तसेच व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या इसमांमध्ये सकारात्मक छंद निर्माण व्हावेत, मानसिक स्वास्थ्य सुधारावे आणि मोकळ्या वेळेचा योग्य उपयोग व्हावा, या उद्देशाने पुस्तके तसेच चेस व लूडो हे इनडोअर खेळ भेट स्वरूपात देण्यात आले. वाचन व बौद्धिक खेळांमुळे आत्मविश्वास वाढून व्यसनांपासून दूर राहण्यास मदत होते, असे यावेळी सांगण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी संकल्प व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक श्री प्रवीण टिप्रवार यांनी माननीय पोलीस आयुक्त सरांचे विशेष आभार मानले व आग्रहाची विनंती केली की, “मा. पोलिस आयुक्त साहेबांनी ऑपरेशन थंडर हे कायम स्वरूपी निरंतर सुरू ठेवावे ”.

 

नागपूर शहर पोलीस दल केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता, समाजातील व्यसनग्रस्त घटकांच्या पुनर्वसनासाठी मानवी व सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने कार्य करीत आहे. ऑपरेशन थंडरअंतर्गत राबविण्यात येणारे हे जनजागृती व पुनर्वसनविषयक उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी तसेच व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.