General

पेन्शन धारकांचे बेमुदत संप


गोरेगाव :- जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या हक्काच्या पेन्शन करिता रस्त्यावर उतरल्याचे चित्र पंचायत समिती गोरेगावच्या प्रांगणात दिसले. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्यांची पेन्शन जमा होणे हे बंधनकारक आहे, मात्र गोंदिया जिल्ह्यात पेन्शन धारकांची स्थिती काही वेगळीच आहे. मागील दोन महिन्यापासून पेन्शन मिळालीच नसल्याने जणू काही आंधळ्याची काठीच हरविल्याची बाब त्यांच्या मनात घर करत आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पेन्शनर असोसिएशन तर्फे खंडविकास अधिकारी गोरेगाव यांना देण्यात आले आहे मात्र, मागणीपूर्ण न झाल्यामुळे आजघडीला (दि.8)त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जिल्हा परिषद सीईओ व पंचायत समितीतील बीडीओ यांच्या निष्काळजीपणामुळे पेन्शन थांबवण्यात आले आहे असे त्यांचे म्हणणे आहे. वाढत्या औषधांच्या किमतीमुळे वयोवृद्ध पेन्शनधारक हवालदील झाले आहेत. या वयात त्यांना आजारपण सतावत असल्यामुळे औषधांच्या पुरवठ्यासाठी पेन्शनचे काय मूल्य असेल याची कल्पना सहजतेने करता येऊ शकते. वेळीच प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.