सामाजिक

आठवडी बाजारात महिलांसाठी स्वच्छता गृह्याची सोय नाही, स्वच्छ पाण्यासाठी ही भटकंती..!

करवसुली नियमित, सुविधा मात्र गायब; काटी आठवडी बाजारातील विक्रेत्यांचा सवाल

काटी/गोंदिया :-  गोंदिया व बालाघाट जिल्ह्यात भाजीपाला विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या काटी येथील रविवारच्या आठवडी बाजारात शेकडो महिला व पुरुष भाजीपाला विक्रेते व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र बाजारात विक्रेत्यांकडून विविध प्रकारचे कर नियमितपणे वसूल केले जात असतानाही आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

काटीच्या आठवडी बाजारात दूरवरून नागरिक भाजीपाला खरेदीसाठी येतात. त्याचप्रमाणे महिला व पुरुष विक्रेते सकाळपासून बाजारात दुकाने थाटतात. मात्र महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच बाजार परिसरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी व्यवस्था नसल्याची तक्रार विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.

पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते. भाजीपाला विक्रीसाठी योग्य जागा व व्यवस्थित दुकानगाड्यांची सुविधा नसल्याने अनेक विक्रेत्यांना चिखलातच बसून व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे भाजीपाला खराब होण्यासह विक्रेत्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो. बाजार परिसरातील हाईमास्ट दिव्याची अवस्थाही समाधानकारक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, बाजाराची जागा ग्रामपंचायत प्रशासनाच्या मालकीची असताना बाजाराची कर वसुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे कर वसुली होत असेल तर त्या बदल्यात विक्रेत्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असल्याचा सवाल उपस्थित होत आहे.

कर वसुलीतून मिळणाऱ्या निधीतून बाजारात स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, व्यवस्थित विक्री जागा, प्रकाश व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अथवा कर वसुलीतील योग्य हिस्सा ग्रामपंचायतीला देण्यात यावा, अशी मागणी नागरिक व भाजीपाला विक्रेत्यांकडून होत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.