General

डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे पशुपालकांच्या समस्या वाढल्या


गोंदिया:- जिल्ह्यात शेतीसह पशुपालन हा पूरक व्यवसाय करून शेतकरी हा आपला उदरनिर्वाह करत असतो. आजघडीला पशुधनाचे संगोपन हे आव्हानात्मक बाब ठरत आहे.त्यातच पशुखाद्याचे भाव गगनाला भिडल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी पशुपालनाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. पशुधनाच्या आरोग्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सल्ले हे अतिशय महत्त्वाचे ठरतात मात्र वेळीच ही सेवा मिळत नसल्याने पशुपालक हा संभ्रमात आहे. सध्याच्या काळात संसर्गजन्य लंपि रोगाने पशुधनाचा मोठा नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यावर उपचाराशिवाय इतर उपाययोजनांसाठी जनजागृती कार्यक्रम शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावे आदी बाबतीत प्रगल्भता दाखवणे गरजेचे आहे त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत कसे वाढवता येईल याविषयी अनुकूल निर्णय घेण्यात यावेत. जिल्ह्यात पशुधन अधिकाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्यामुळे सदर समस्या उद्भवली आहे, मात्र ज्या श्रेणी 1 दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहेत त्या ठिकाणी सेवा देताना दिसत नाही तर तेथे उपस्थिती म्हणून अनेकदा कर्मचारीच वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका निभवतांना दिसतो. मुख्यतः दुधाळ जनावरांसाठी ही बाब अधिकच धोकादायक ठरत आहे. यावेळी जनावरांच्या समस्या ओळखून योग्य उपचार मिळाला नाही तर त्या पशुधनाचे जीवन वाया जाण्याची शक्यता उद्भवते. गोंदिया तालुक्यातील कटंगी येथील श्रेणी एक दवाखान्यात सदर चित्र पाहायला मिळाले. तेथे नियुक्त झालेले डॉक्टर रुजू झाले नसल्याची माहिती पुढे आली आहे.शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांवर किती मोठे संकट कोसळू शकते याची कल्पना न केलेलेच बरे. विश्वसनीय सूत्रा कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्ह्यात पशुधन विकासासाठीआलेला करोडो रुपयांच्या निधी परत करण्यात आला. हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर झालेला अन्यायच म्हणावा लागेल..! अनेक पशुधन विकास अधिकारी कामाच्या नावावर हलगर्जीपणा करण्यात व्यस्त असतात. त्याबाबत अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होतात यावर कार्यवाही मात्र शून्यच! कार्यवाही झालीच तर हेतूपुरस्सर केली जाते. जिल्हा पशुधन विकास अधिकारी आपल्या कार्याबाबत गंभीर नसल्याचे त्यांच्याच विभागातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारून हे सिद्ध केले आहे.इतकेच नव्हे तर पशुसंवर्धन सभापतींशी सुद्धा त्यांचे तालमेल जमत नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या विभागाला ‘अच्छे दिन’ कधी येतील हे सांगणे कठीणच आहे.