साहित्य

प्रो.डॉ.बबन मेश्राम यांची वृक्षवेल राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

– शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील योगदानाची दखल; वरठी येथे होणार सन्मान

भंडारा : – समता नगर, फेज-२, भंडारा येथील रहिवासी, वृक्षप्रेमी, साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रो. डॉ. बबन मेश्राम यांची वृक्षवेल राज्यस्तरीय भिन्न भाषिक साहित्य मंच, महाराष्ट्र-भारत यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या वृक्षवेल राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष किशोरकुमार मलेवार यांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही निवड केली आहे.

प्रो. डॉ. मेश्राम हे सध्या एन. एम. डी. महाविद्यालय, गोंदिया येथे समाजशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून, राष्ट्रीय सेवा योजना, गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. याशिवाय ते लायन्स क्लबचे झोन चेअरपर्सन म्हणून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. शिक्षण, समाजप्रबोधन, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजात सकारात्मक योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा स्व. पार्वताबाई मदनकर कला महाविद्यालय, वरठी येथे दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोज रविवार ला आयोजित राज्यस्तरीय तिसऱ्या कवी संमेलन व सत्कारमूर्ती पुरस्कार वितरण सोहळ्यात पार पडणार आहे. या कार्यक्रमात कवी संमेलनाचे उद्घाटक आमदार राजूभाऊ कारेमोरे, भंडारा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ. मधुराताई मदनकर, वृक्षवेल साहित्य मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोरकुमार मलेवार, सचिव संजय येरणे, प्राचार्य डॉ. आशिष बोरकर, सरपंच चांगदेव रघुर्ते, ऑक्सिजन पार्कचे निर्माते वर्धा येथील मुरलीधर बेलखोडे, साहित्यरत्न नागोराव सोनकुरे तसेच साहित्यरत्न सौ. लीलादेवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रो. डॉ. मेश्राम यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या निवडीबद्दल गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव खासदार राजेंद्रजी जैन, संचालक निखिल जैन, प्राचार्य डॉ. रविंद्र मोहतुरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांच्यासह प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, मित्रपरिवार व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.