जि प शाळा जीरुटोला येथे पेयजलाचा अभाव
गोंदिया :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने शासन अनेक उपाययोजना करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याच्या प्रयत्न करत असते. त्यासाठी मिड डे मिल योजना, स्वच्छ पेयजलाचा पुरवठा, स्वच्छतागृह आदी सोयी सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासनाचा असतो मात्र ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये आजही या गरजांची पूर्तता होत नसल्याचे चित्र सर्रास पहाण्यास मिळते. विशेष म्हणजे ही शाळा मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेलगत असून येथे समाजातील गोरगरीब कष्टकरी वर्गाचे 35 विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत मागील मे महिन्यात विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या दृष्टीने शासनातर्फे पाण्याची टाकी व सोलर पंप द्वारे विद्युत पुरवठा करून स्वच्छ पेयजल उपलब्ध करण्यात आला. मात्र सदर पाण्याचा संच बंद असल्यामुळे आज घडीला विद्यार्थ्यांना स्वच्छ पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकरणाची माहिती ग्रामपंचायतचे सरपंच सचिव यांना रीतसर पत्रव्यवहार करून देखील विद्यार्थ्यांच्या मूळ समस्येकडे त्यांचं लक्ष नसल्याने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र पायपीट करावी लागते. अनेक वर्षानंतर अवघ्या सहा महिन्यापूर्वीच नवीन संयंत्र बसवण्यात आले तरी तो नादुरुस्त पडला यावरून त्याची गुणवत्ता कशी असेल याच्या अंदाजा अचूक लावला जाऊ शकतो. ग्रामीण भागातील जनप्रतिनिधी कशा पद्धतीने कार्य करतात याचे उत्तम उदाहरण यावरून लक्षात येते. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन जो निधी उपलब्ध करतो त्याची अंमलबजावणी करताना स्थानिक जनप्रतिनिधीच त्याची उचलबांगडी करत असतील तर ग्रामीण भागात विकासाच्या प्रवाह वाहणार कसा या प्रकारावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने ग्रामसेवकासारखा कर्मचारी नेमून दिला असला तरी ग्रामीण भागातील समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यावरून या प्रकाराला ग्रामीण भागाचा विकास की भकास काय म्हणावं हीच का ती डिजिटल शाळा जिथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या शाळेत स्वयंपाकासाठी किचन शेड नाही, इमारत जुनी व जीर्ण झाली आहे अशा अनेक समस्यांनी ग्रस्त शाळा तेथे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जा वाढणार का? असा सवाल जनसामान्यांकडून केला जात आहे. प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घ्यावी असा इशारा ग्रामीणानी दिला.