General

खासगी बस चालकाला स्थानिकांनी दिला चोप!

गोंदिया :- ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन कामासाठी घरून शहराकडे आवागमन करावे लागते. त्यात शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. त्यांना वेळेवर शाळा कॉलेज गाठण्यासाठी महामंडळ तसेच खाजगी बसेसचा आधार घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून खाजगी बसेसचे वाहक चालक हे स्थानिक नागरिकांना स्थान न देता व्यवसायिक दृष्ट्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाच प्राथमिकता देत असल्यामुळे स्थानिक प्रवाशांना सायंकाळच्या वेळी दोन ते चार तास वाट पाहावी लागत असे त्यात विद्यार्थी, महिला व सामान्य नागरिकांच्या जीवाचे हाल होत होते. ही समस्या सतोना येथील स्थानिकांना लक्षात येताच त्यांनी संबंधित खाजगी वाहन चालकांना समज देण्याचा प्रयत्न केला मात्र एका चालकाने स्थानिकांशी अरेरावी करत असल्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जमावाने त्यास चांगलाच चोप दिला ही घटना गोंदिया- बालाघाट महामार्गावरील सतोना येथे (दि.16 सप्टें)रोजी घडली. या बाबीची दखल घेताच खाजगी बस मालकाने त्या चालकास कामावरून काढून स्थानिक नागरिकांना सुद्धा प्राथमिकता देवून आपले सेवाभाव कायम ठेवले. एसटी महामंडळाने या महामार्गावरील बस फेऱ्या कमी केल्यामुळे स्थानिक प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अशी चर्चा आहे.